दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिकाई) यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुणे येथील रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध वयोगटांतील ६०० हून
.
या स्पर्धेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता, रंगसंगती आणि चित्रकलेतील कौशल्ये वापरून निसर्ग, सामाजिक विषय, त्यांची स्वप्ने आणि आत्मविश्वास यांचे प्रभावी चित्रण केले. दिव्यांग कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र सायबर विभाग, मुंबई येथील पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे, डिकाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ध्यान गुरु रघुनाथ येमुल गुरुजी, रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक जयंत टोले, डिकाई संस्थेचे सचिव शेखर यादव आणि समन्वयक प्रशांत मोहोळकर यांचा समावेश होता.
ज्येष्ठ कलाकार प्रमोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, एकाग्र चित्त, सातत्यपूर्ण सराव आणि सर्जनशील दृष्टिकोन यातून चित्रकला व शिल्पकलेत यश मिळवता येते. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्यास त्यांना कलेत करिअर करण्यासाठी मदत करू, असेही कांबळे यांनी नमूद केले.
डिकाई संस्थेतर्फे लवकरच एक डिजिटल पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कला-कौशल्य विकासासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाईल. याव्यतिरिक्त, डिकाईने यावेळी तीन दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण व उच्च शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा संकल्पही जाहीर केला.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्याच्या सायबर सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी सायबर सुरक्षेबाबत महत्त्वाचा इशारा दिला. सोशल मीडिया आणि लहान मुले हे सायबर चोरट्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ बनत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. सोशल मीडियावर दिसणाऱ्या अनेक जाहिराती फसव्या असतात आणि कोणतीही चाचपणी न करता सोशल मीडिया किंवा नवीन ॲप्सच्या अटी स्वीकारणे धोकादायक ठरू शकते, असे शिंत्रे म्हणाले. लहान मुले गेम्स खेळत असताना येणाऱ्या जाहिराती, लिंक्स किंवा मेसेजेसद्वारे सायबर गुन्हेगार मोबाईलमध्ये व्हायरस सोडून माहिती चोरतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना आणि लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

