![]()
हिंगोली जिल्ह्यात बोगस खते व किटकनाशकांचा सुळसुळाट झाला असून याकडे कृषी खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 28 गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या छायाचित्राला पैशांचा हार घालून आंदोलन केले. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस पेस्टिसाइड व कीटकनाशक औषधांची विक्री होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अनेक कंपन्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व जिल्हा कृषी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोगस औषधांची विक्री करत असल्याचा आरोप करत, संबंधित कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून बोगस कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, जगदीश बनसोडे, अशोक कावरखे, अमोल एकशिंगे, राहुल कावरखे, अमोल गिरे, प्रविण मते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावे्ळी कावरखे व पतंगे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सुमारे 90 टक्के कीटकनाशकांची गुणवत्ता संशयास्पद असून, निकृष्ट व बोगस औषधांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कृषी विभागाकडून दोषी कंपन्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दम्यान, हिंगोली जिल्ह्यात विक्री होणाऱ्या सर्व संशयित कीटकनाशकांची तात्काळ तपासणी करण्यात यावी. बोगस औषधे विकणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली असून या मागणीसाठी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात बोगस किटकनाशकांचा सुळसुळाट:कृषिमंत्री भरणेंच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
