![]()
आयएएस सत्यम गांधी यांनी आपल्या स्वानुभवातून तरुणांना करिअर आणि आयुष्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस झालेले गांधी म्हणाले की, करिअरसाठी १८ ते २५ हा वयोगट अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळातच काहीतरी मोठे साध्य करता येते. गांधी यांनी सांगितले की, त्यांनी वयाच्या १८ वर्षांपर्यंत एकाच शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर पदवी मिळवून दिल्लीत यूपीएससीची तयारी केली. सतत शिकण्याची जिद्द, उद्दिष्टांप्रती सतर्कता आणि काहीतरी नवीन करण्याची खुणगाठ यामुळे त्यांना यश मिळाले. सध्या ते अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी पालघरमध्ये एसडीओ आणि प्रकल्प संचालक, तसेच सांगली महापालिकेचे आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी कुटुंबावर १५ लाख रुपयांचे कर्ज झाले होते. आजोबा आणि वडिलांनी यासाठी खूप कष्ट घेतले. मात्र, नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी हे कर्ज फेडून कुटुंबाला कर्जमुक्त केले, असेही गांधी यांनी नमूद केले. गांधी यांच्या कुटुंबात अभियंता आणि डॉक्टर असले तरी आजोबांना एक आयएएस अधिकारी असावा अशी इच्छा होती. शालेय जीवनापासूनच ते सत्यम गांधींमध्ये एक अधिकारी शोधत होते. जेव्हा ते पहिल्यांदा अधिकारी म्हणून सरकारी वाहनातून घरी गेले, तेव्हा आजोबांना खूप आनंद झाला. त्यांच्या स्वागताला अधिकारी आणि सुरक्षारक्षक पाहून आजोबांच्या भावना अवर्णनीय होत्या, असे गांधी यांनी सांगितले. तरुणांना मार्गदर्शन करताना गांधी यांनी इन्स्टाग्राम आणि रील्ससारख्या सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. विशेषतः १८ ते २५ या वयोगटातील तरुणांनी पुस्तके आणि वर्तमानपत्रांशी नाते जोडावे. रात्री उशिरापर्यंत जागे राहून वेळ वाया घालवण्याऐवजी वेळेत झोप घ्यावी आणि झोपण्यापूर्वी दिवसाचा दिनक्रम लिहून त्यातील टाळण्याजोग्या गोष्टींवर दुसऱ्या दिवशी मात करावी, असे आवाहन त्यांनी केले. गांधी यांनी एक भावनिक प्रसंगही सांगितला. ते आयएएस झाल्यानंतर त्यांच्या ९९ वर्षीय आजोबांनी ‘माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या’ असे सांगत अन्नत्याग सुरू केला. १६ दिवसांनी त्यांचे निधन झाले. आजोबांना कोणताही आजार नव्हता, मात्र त्यांच्या शेवटच्या क्षणी आपण त्यांच्याजवळ नव्हतो, ही बोच त्यांना आजही सतावत आहे, असे त्यांनी म्हटले.
IAS सत्यम गांधी: करिअरसाठी 18-25 वय महत्त्वाचे:मित्र निवडा, सोशल मीडिया टाळा; आयुष्याचे पैलू उलगडले
