कोल्हापुरात सराईत गुन्हेगाराची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या:महेश दळवीवर अज्ञातांचा गोळीबार, दानोळी परिसरात दहशत

महाराष्ट्र




कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जयसिंगपूरजवळील दानोळी गावात सराईत गुन्हेगार महेश दळवी यांची अज्ञातांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. या गोळीबाराच्या थरारक घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला असून परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, दळवी यांच्यावर हा गोळीबार कोणी आणि नेमक्या कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकारामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरात गुन्हेगारीत वाढ गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. नुकतेच माणगाव येथे एका 13 वर्षीय चिमुकलीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच आता दळवींच्या हत्येची घटना उघडकीस आल्याने, ‘कोल्हापुरात नेमकं चाललंय तरी काय?’ असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. नाशिकमध्येही गोळीबाराचा थरार दुसरीकडे, नाशिक शहरातील आडगाव परिसरातही एका युवकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात उमेश मालोदे हे थोडक्यात बचावले आहेत. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात असून या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. आडगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नाशिकमध्येही गुन्हेगारी फोफावत असल्याचा प्रश्न उपस्थित होत असून, आरोपींच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होणार आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry