नांदेड(प्रतिनिधी) :- निसर्गाची अवकृपा, पावसाचा दीर्घ खंड, सोयाबीन पिकाचे नुकसान, डोक्यावर कर्जाचा भार आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची चिंता… अशा अनेक संकटांनी घेरलेल्या नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंकर आबानराव क्षीरसागर (वय ४६) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या टोकाच्या पावलापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून आपल्या व्यथा मांडल्या. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शंकर क्षीरसागर यांच्याकडे अल्प प्रमाणात शेती होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळण्याच्या आशा मावळल्या. एकीकडे शेतीतील नुकसान, तर दुसरीकडे कर्जाची परतफेड आणि कौटुंबिक खर्च यामुळे त्यांच्यापुढील आर्थिक संकट अधिक गंभीर झाले होते.
क्षीरसागर यांच्या कुटुंबात दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीबाबत शासनाकडून घोषणा करण्यात येत असल्या, तरी अर्ज करूनही आपल्या मुलीची फी माफ झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. शेतीचे नुकसान आणि मुलीच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चामुळे ते चिंतेत असल्याचे त्यांच्या व्हिडिओतून समोर आले.
सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास क्षीरसागर शेतात गेले. तेथे त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नातेवाईक आणि पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी शेतात गळफास घेतल्याचे आढळले. या घटनेप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
‘कर्जमाफी झालीच पाहिजे’; व्हिडिओतून प्रशासनाला आर्त साद
आत्महत्येपूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून कर्जमाफीची मागणी केली. कोणत्याही कर्जमाफी योजनेत आपले नाव आले नसल्याची तक्रार त्यांनी केली. तसेच, विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीच्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या फीमाफीसाठी अर्ज करूनही दिलासा मिळाला नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली.
शंकर क्षीरसागर यांच्या मृत्यूमुळे एका कुटुंबाचा आधार हरपला असून, त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले आणि कुटुंबीयांचा आधार हरपल्याची वेदना उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे प्रश्न, कर्जमाफी योजनांचा लाभ आणि विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
संबंधित व्हिडिओ…

Post Views: 60
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad