![]()
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेतील तफावत हा केवळ तांत्रिक मुद्दा आहे. कर्जमाफीची रक्कम दोन भागांत विभागली असून, त्यापैकी सध्या एकच भाग पोर्टलवर दिसत आहे. उर्वरित कर्ज रक्कम बँकामार्फत शेतकऱ्यांना माफ केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांच्या आत असूनही ई-केवायसी करताना कमी रकमेचा आकडा दर्शविला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ही फसवी कर्जमाफी आहे का, असा प्रश्न ते विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभाग व बँक अधिकाऱ्यांसह सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दोन लाख रुपयांच्या मर्यादेत सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. सध्या ई-केवायसी करताना जो आकडा पोर्टलवर दर्शविला जातो, तो थेट शासनातर्फे दिला जाणार आहे, तर उर्वरित रक्कम बँका देणार आहेत. कर्जमाफीचे सूत्र ठरवतानाच बँका आणि शासनात तसा करार झाला आहे. त्यामुळे कुणाचेही नुकसान होणार नसून, दोन लाख रुपयांच्या मर्यादेत सर्वांनाच कर्जमाफी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख २४ हजार १४२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे महाआयटीच्या यादीद्वारे स्पष्ट झाले आहे. यापैकी पहिल्या यादीत ७६ हजार ९७६ शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली असून, आजपर्यंत ४६ हजार ४२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण केले आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक केले असणे आणि त्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले असणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी बिनदिक्कत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना ई-केवायसी करून देण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांना (सीएससी) देण्यात आले आहेत. ही सेवा त्यांनी विनामूल्य द्यायची आहे. जर कुणी या सेवेसाठी रक्कम आकारली, असे दिसून आले, तर अशा केंद्राचे लायसन्स रद्द केले जाईल. माध्यमांशी संवाद साधल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभाग व बँक अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची जाहीर झालेली यादी आणि सध्याची स्थिती याचा आढावा घेण्यात आला. सर्व सहायक निबंधकांनी केवायसी शिल्लक असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी दररोज उपलब्ध करून देत कामाला गती द्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
कर्जमाफीतील रकमेची तफावत तांत्रिक मुद्दा:शेतकऱ्यांनी घाबरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; बँकेत मदत केंद्र उघडणार
