ज्ञानेश्वरी-एकनाथी भागवत ही भाष्ये तर तुकाराम गाथा संकलन:गोविंददेव गिरी यांच्या वक्तव्याने वारकरी संतप्त; संतपरंपरेच्या गाभ्यावर प्रश्नचिन्ह




पुण्यात झालेल्या एका राष्ट्रीय चर्चासत्रात केलेल्या वक्तव्यामुळे स्वामी गोविंददेव गिरी महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या तीन दिवसीय कार्यक्रमात बीजभाषण करताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेबाबत केलेली मांडणी वारकरी समाजाला खटकली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार संतपरंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ आहे; तर ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ही भाष्ये आहेत, तसेच तुकाराम गाथा आणि नामदेव महाराजांच्या गाथा या संकलन स्वरूपातील असल्याने त्यांना स्वतंत्र ग्रंथ म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या विधानानंतर वारकरी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील समता, बंधुता आणि भक्तीभावाची मूळधार मानली जाते. संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या कार्यातून महाराष्ट्र धर्माची वीण घट्ट विणली गेली. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस, ही परंपरेची शिकवण आजही भाविकांच्या ओठांवर आहे. अशा पार्श्वभूमीवर संतपरंपरेतील प्रमुख ग्रंथांविषयी वेगळी भूमिका मांडल्याने अनेक वारकरी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांच्या मते, संतपरंपरेच्या गाभ्यावरच प्रश्न उपस्थित केल्यासारखे हे वक्तव्य आहे. चर्चासत्रात महाराजांनी केलेल्या निरुपणामागे नेमका कोणता संदर्भ होता, याबाबत स्पष्टता नसली तरी त्यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. संतपरंपरेतील ग्रंथांचे स्वरूप, भाष्य आणि संकलन यांबाबतचा शास्त्रीय विचार असू शकतो, असे काहींचे मत असले तरी वारकरी पंथातील अनेकांना हे भाष्य खटकले आहे. संत साहित्य हे केवळ ग्रंथरूप नसून ते लोकांच्या जीवनाशी जोडलेले आध्यात्मिक अधिष्ठान आहे, असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतांच्या ग्रंथांविषयीची कोणतीही तुलनात्मक भूमिका संवेदनशील ठरते. रामदासी आणि वारकरी पंथ यांच्यात विचारांची भिन्नता असली, भक्तीमार्गात वेगळेपणा असला तरी अंतिम ध्येय ईश्वरप्राप्तीच आहे, असे वारंवार सांगितले जाते. परंतु या ताज्या वक्तव्यामुळे दोन्ही परंपरांमध्ये अनावश्यक वाद उभा राहू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. संतपरंपरेच्या फडांमध्येही या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक वारकरी संघटनांनी महाराजांच्या विधानाचा समाचार घेत निषेध व्यक्त केला आहे. राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरएसएसचे प्रॉडक्ट – संभाजी ब्रिगेड दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंगही चढू लागला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी स्वामी गोविंददेवगिरी महाराजांवर टीका करताना त्यांना आरएसएसचे प्रॉडक्ट, असे संबोधले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा ही बहुजनांसाठी असल्याचे सांगत त्यांनी महाराजांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रतिक्रियेमुळे वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संत साहित्य, त्याचे स्वरूप आणि परंपरेतील स्थान यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. वारकरी परंपरेभोवतीचा वाद पुन्हा पेटला एकूणच, पुण्यातील या भाषणानंतर वारकरी परंपरेभोवतीचा वाद पुन्हा पेटला आहे. काही दशकांपासून वारकरी परंपरेवर विविध प्रकारचे आघात होत असल्याची भावना व्यक्त केली जात असताना या नव्या विधानाने त्यात भर घातली आहे. संतपरंपरेतील कच्चे दुवे शोधून वाद निर्माण केले जात असल्याची ओरड वारंवार होत असते. अशा वेळी संत साहित्याविषयी संवेदनशील आणि समतोल भूमिका अपेक्षित असल्याचे वारकरी सांगत आहेत. या वादावर पुढे कोणती स्पष्टीकरणे येतात आणि तो कसा निवळतो, याकडे राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे. स्वामी गोविंद देवगिरी यांनी तातडीने माफी मागावी – जयंत पाटील स्वामी गोविंद देवगिरी यांनी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा या ग्रंथांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करत तीव्र आक्षेप नोंदवला. जयंत पाटील यांनी म्हटले की, ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे आणि वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आहेत. या ग्रंथांविषयी केलेले विधान समाजात तेढ निर्माण करणारे ठरू शकते. त्यामुळे स्वामी गोविंद देवगिरी यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राज्य सरकारने या वक्तव्याची गंभीर दखल घ्यावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *