विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली फसवणूक:25 महिलांच्या तक्रारी, घोटाळ्याची रक्कम वाढण्याची शक्यता




अंजनगाव सुर्जी येथे केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सुमारे २५ महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी नोंदवल्याने घोटाळ्याची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. निमखेड बाजार येथील फुलवंती राजकुमार तोटे (३९) यांनी या प्रकरणी मुख्य तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिलेने १२ मार्च रोजी तिच्या पतीसह सावरपाणी गावात विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती दिली होती. तिने ६००० रुपयांमध्ये वॉशिंग मशीन, शिलाई मशीन यांसारख्या गृहोपयोगी वस्तू देण्याचे आणि त्या मिळाल्यावर १८,००० रुपये शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही महिलांना वस्तू मिळाल्याने आरोपीवर विश्वास बसला. यानंतर आरोपीने फुलवंती तोटे यांना ५० टक्के अनुदानाच्या योजनेतून २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून त्यासाठी आधी पैसे जमा करण्यास सांगितले. यावर विश्वास ठेवून फुलवंती यांनी फोन पे आणि रोख स्वरूपात एकूण ९ लाख १२ हजार रुपये आरोपीला दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मुलीला अचलपूर येथील सरकारी दवाखान्यात सुपरवायझर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची मागणी केली. फुलवंती यांनी बचत गटातून कर्ज काढून त्यापैकी ३ लाख रुपये २४ मे रोजी आरोपीच्या घरी जाऊन दिले. सुरक्षेचे कारण देत आरोपीने फुलवंती यांचे सेंट्रल बँक अंजनगाव शाखेचे ४ आणि बँक ऑफ महाराष्ट्र अंजनगाव शाखेचे १० असे एकूण १४ सह्या केलेले कोरे चेक, बँक पासबुक आणि काही कोऱ्या फॉर्मवर सह्या घेऊन ते दस्तऐवज स्वतःकडे ठेवले. अनेक दिवस उलटूनही कर्ज किंवा नोकरी न मिळाल्याने फुलवंती यांनी पैसे परत मागितले असता, आरोपीने त्यांना फोन करून त्रास न देण्याची आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. निमखेड, लखाड, कारला, भंडारज, सावरपाणी, चिंचोना, परतवाडा तसेच चिखलदरा तालुक्यातील टेंबुरसोंडा, गिरगुटी, जामली आणि जिल्ह्याबाहेरील अकोला व आकोट येथील काही महिलांनाही आरोपी महिलेने गंडा घातल्याची चर्चा आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून, या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *