अभिनेत्री शर्वरी जैमिनिस: स्त्री कुटुंबाला व समाजाला आधार देते:'बाई पण भारी देवा' कार्यशाळेत व्यक्त केले मत




पुणे, प्रतिनिधी: अभिनेत्री शर्वरी जैमिनिस यांनी नुकतेच सांगितले की, स्त्री ही शक्ती असून ती सशक्त विचार, नैसर्गिक कणखरता आणि संकटांशी लढण्याची क्षमता बाळगते. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ती सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असते. शारीरिक वेदना आणि भावनिक आव्हाने सहन करत ती स्वतःसोबतच कुटुंब आणि समाजाला आधार देते. तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे आयोजित ‘तनुश्री संस्कार साधना’ अंतर्गत ‘बाई पण भारी देवा’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी कलाकार किशोर महाबोले, अभिनेत्री अश्विनी कासार, मधुरा रेसिपीच्या मधुरा बाचल, केसरी टूर्सच्या झेलम चौबळ, डॉ. सुनंदा रानडे, डॉ. अस्मिता वेले आणि वीणा गोखले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. तन्वी खाबिया (गुगळे), डॉ. अनिल गुगळे आणि खाबिया कुटुंबीयही उपस्थित होते. याप्रसंगी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना ‘तनुश्री जन संस्कार पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. शर्वरी जैमिनिस पुढे म्हणाल्या की, सशक्त जीवनशैलीसाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्त्रियांनी आनंदी होण्यासाठी कारणे शोधण्याची गरज नाही; त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिकावे. स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून स्वतःवर प्रेम करावे. डॉ. सुप्रिया गुगळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “हे विश्वची माझे घर” हा अनुभव आज येतो. ‘बाईपण भारी देवा’ हे केवळ एक वाक्य नसून ती एक जाणीव आणि सामर्थ्य आहे, जे प्रत्येक स्त्रीकडे असते. ती हसणे कधी विसरत नाही, ती थकते पण थांबत नाही. प्रेम, सहनशक्ती आणि सामर्थ्याची ती प्रचिती आहे. प्रा. डॉ. अस्मिता वेले यांनी ‘स्त्री आरोग्य आणि आयुर्वेद’ या विषयावर बोलताना सांगितले की, महिलांना या संदर्भात जागृत करणे काळाची गरज आहे. आपली दिनचर्या नियमित व व्यवस्थित ठेवल्यास त्या आजारी पडणार नाहीत. परंतु, आजच्या काळात त्या तणाव आणि डिप्रेशनमध्ये जाताना दिसतात. मोनोपॉजमध्ये आल्यावर त्यांच्या शरीरातील बदलत्या हार्मोन्समुळे हे घडत असते, त्यासाठी सतत सजग राहावे. मुलींनी आहार आणि व्यायामाबद्दल जागृत असावे. किशोर महाबोले यांनी नमूद केले की, या भूतलावर निसर्गाने मादी आणि माती या दोघांना बीज निर्मितीचा खरा आनंद दिला आहे. तसेच, जीवन जगण्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर निस्वार्थ आणि उदात्त हेतूने अनोळखी व्यक्तीला मदत करावी. ‘बाई पण भारी देवा’ ही एका अर्थाने सन्मानजनक गोष्ट आहे. अश्विनी कासार म्हणाल्या की, प्रत्येक महिलेने स्वतःच्या आवडीला करिअर म्हणून निवडल्यास अभिव्यक्ती जपण्याचे सामर्थ्य निर्माण होते. तिने आत्ममग्न असण्यासोबतच आत्मभान ठेवून जीवन जगावे, जेणेकरून आनंद शोधण्याची गरजच भासणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *