![]()
शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन, मोटार पंप तसेच इतर शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा वालचंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटार पंप, केबल वायर आणि इतर साहित्य चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिसांनी विशेष तपास पथक तयार करून गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान जयदीप नानासो घोळवे आणि त्याच्या साथीदारांकडून शेतकऱ्यांच्या ट्रॉली चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयदीप नानासो घोळवे (२२), मेघराज नानासो आंबोसे (२२) आणि आकाश विलास शिंदे (२३, सर्व रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा समावेश आहे. आरोपींकडून एक ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन, सौर मोटार पंप तसेच चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.
शेतकऱ्यांच्या साहित्यचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
