Amol Mitkari Questions Ajit Pawar Plane Accident Report; AAIB Under Fire



सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीए, व्हिएसआर व एएआयबीमध्ये कोण कुणाला वाचवत आहे हेच कळत नाही.

.

अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर काल या घटनेला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर एएआयबीने (विमान अपघात तपास ब्यूरो) या घटनेशी संबंधित आपला प्राथमिक अहवाल जाहीर केला. या अहवालात अजित पवारांचे विमान प्रथम झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, DGCA +VSR = AAIB कोण कुणाला वाचवतंय तेच कळेना. मात्र महाराष्ट्राला दुधखुळ समजु नका.

अजित पवारांचे विमान झाडाला धडकले नाही

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओही जोडला आहे. त्यात एएआयबीच्या अहवालातील अजित पवारांचे विमान झाडाला धडकून नंतर खाली कोसळल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे. अजित पवारांचे विमान अचानक आडवे होऊन पडले आहे. हे विमान 200 ते 250 उंचीवर आडवे होताना कोणत्याही झाडाला धडकले नाही हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, असे या व्हिडिओत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवारांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकल्याच्या एएआयबीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आत्ता पाहू काय आहे AAIB च्या अहवालात?

एएआयबीने आपल्या 22 पानी अहवालात म्हटले आहे की, बारामती विमानतळावरील कमी दृश्यमानता, व्हीएफआर (Visual Flight Rules) नियमांचे उल्लंघन, एअरफिल्ड अपुऱ्या सुविधा, स्वतंत्र MET सुविधेचा अभाव यामुळे ही विमान दुर्घटना घडली. विशेषतः अपघातावेळी हे विमान अगोदर झाडांवर कोसळले. त्यानंतर ते खाली पडून त्याला आग लागली, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अजित पवारांच्या विमानाने लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नानंतर गो अराऊंड केले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ते धावपट्टीच्या डाव्या बाजूला 50 मीटर अंतरावर कोसळले. अपघाताच्या काही क्षणापूर्वी कॉकपिटमधून ‘ओह शिट’ असा आवाज आला, असेही हा अहवाल सांगतो.

रोहित पवारांचाही अहवालावर आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एएआयबीच्या अहवालावर सवाल उपस्थित केला आहे. प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे. मी मुंबईत यावर सविस्तर बोलेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *