![]()
बिहारमधील सहरसा येथे एका प्रवासी ट्रेनला आग लागली. सिमरी-बख्तियारपूर स्टेशनवर उभ्या असलेल्या समस्तीपूर-सहरसा मेमू ट्रेनच्या (63344) इंजिनला सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी ट्रेनच्या डब्यातून उड्या मारून पळ काढला. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की, बघता बघता आगीने पुढील डब्यालाही आपल्या कवेत घेतले. इंजिनसह एक डबा जळून खाक झाला. घटनेच्या कारणांची चौकशी सुरू झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीच्या घटनेनंतर स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. प्रवासी व स्थानिक लोकांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळावरून आलेले काही फोटो… इंजिनमधून धूर निघाला, मग आग पसरली समस्तीपूर-सहरसा डेमू सोमवारी पहाटे 3:44 वाजता सिमरी बख्तियारपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पोहोचली होती. ट्रेन थांबल्यानंतर थोड्याच वेळात इंजिनमधून धूर निघू लागला. सुरुवातीला लोकांनी याला सामान्य तांत्रिक समस्या समजले, पण काही मिनिटांतच धुराचे रूपांतर आगीच्या तीव्र ज्वाळांमध्ये झाले. त्यावेळी अनेक प्रवासी झोपले होते. आग आणि धुरामुळे प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. ते आपला जीव वाचवण्यासाठी बोगीतून बाहेर पळाले. आगीच्या ज्वाळा पाहून इतर बोगींमधील प्रवासी उड्या मारून पळू लागले. 2 तासांत आगीवर नियंत्रण माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक अग्निशमन गाड्या घेऊन आग विझवण्यासाठी पोहोचले. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, पण काही वेळाने त्याच बोगीमध्ये पुन्हा आग भडकली. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवासी ऋतिकने सांगितले की, मी रेल्वे हेल्पलाइनला ट्रेनला आग लागल्याची माहिती दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी मला ट्रेनला लागलेल्या आगीचा व्हिडिओ मागितला. मी व्हिडिओ बनवून त्यांना पाठवला. तर प्रवासी जितेंद्र कुमारने सांगितले की, ज्या बोगीला आग लागली होती, त्याच्या अगदी शेजारच्या बोगीमध्ये मी बसलो होतो. अनेक गाड्यांना झाला उशीर सिमरी बख्तियारपूरचे स्टेशन मास्तर संजय कुमार सज्जन यांनी सांगितले की, 3 वाजून 22 मिनिटांनी त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या मेमू पॅसेंजर ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळाली. तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. यानंतर सहरसा-मानसी रेल्वे मार्गावर 3 तास अनेक गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. मनिहारी-जयनगर जानकी एक्सप्रेस, सहरसा-समस्तीपूर पॅसेंजर ट्रेन, सरायगडहून देवघरला जाणारी श्रावण स्पेशल ट्रेन आणि पूर्णियाहून हटियाला जाणारी कोसी एक्सप्रेस ट्रेन यांची वाहतूक विस्कळीत झाली.
समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला आग:प्रवाशांनी मारल्या उड्या, इंजिनसह 1 बोगी भस्मसात; सिमरी बख्तियारपूर स्टेशनवर अपघात
