![]()
हिंगोलीच्या जिल्हा परिषदेत जटाळवाडी (ता.कळमनुरी) येथील गावकऱ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना सोमवारी ता. ३ घेराव घातला. सहा वर्गासाठी तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून तातडीने शिक्षकाची नियुक्ती करावी अन्यथा शाळेला कुलुप ठोकण्याचा इशाराही दिला आहे. कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत सध्याच्या स्थितीत १०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी शिक्षकांची संख्या अपुरी आहे. एका शिक्षकांची सेनगाव तालुक्यात प्रतिनियुक्ती झाल्यामुळे आता या ठिकाणी तीनच शिक्षक कार्यरत आहेत. या ठिकाणी सहावर्गासाठी तीनच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांतून करण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकाची सेनगाव तालुक्यात झालेली प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना पुर्ववत जटाळवाडी येथे रूजू करावे अशी मागणी ता. ३ जुलै रोजी करण्यात आली होती. त्यावेळी शिक्षण विभागाने या संदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कळविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालकांनी कळमनुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता जटाळवाडी शाळेला देण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तातडीने शिक्षक द्यावा, अन्यथा शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा या प्रकारानंतर संपप्त झालेल्या पालक व गावकऱ्यांनी सोमवारी थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठले. या ठिकाणी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना घेराव घालून तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यापुर्वी दिलेल्या आश्वासनाचीही गावकऱ्यांनी आठवण करून दिली. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून तातडीने शिक्षक द्यावा अन्यथा सात दिवसांत शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा दिला. यावेळी शिक्षणाधिकारी काळे यांनी प्रतिनियुक्ती वरील शिक्षकास परत जटाळवाडी येथे पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेतून काढता पाय घेतला.
हिंगोलीत शिक्षकांच्या कमतरतेवरून गावकऱ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव:7 दिवसांत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा
