शिवरे शाळेत व्यवहारज्ञानाचे धडे:विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढवण्यासाठी उपक्रम‎




शिवरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी (दि.२८) बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. शालेय पुस्तकातील ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध खाद्यपर्थांचे स्टॉल मांडून खरेदी – विक्रीचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण करणे हे या बाल आनंद मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट होते. याशिवाय, लहान वयातच पैशांचे नियोजन, नफा-तोटा आणि ग्राहकांशी संवाद कसा साधावा, याचे प्रत्यक्ष व्यवहारज्ञान मुलांना या मेळाव्याच्या माध्यमातून मिळाले. शाळेच्या प्रांगणात सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी स्टॉल्स सजवले होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाभाऊ साबळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. पालकांनी या मेळाव्यास भेट देऊन मुलांचा उत्साह वाढवला व त्यांच्याकडून खाद्यपदार्थांची खरेदी केली. डॉ. अरुण कातकाडे, विश्वस्त बबन सानप, जनार्दन सानप व प्राचार्य सांगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक भावना शाह, योगिता गोसावी, भारती पाटील आणि प्रदिप देवरे आदींनी केले . खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पाणीपुरी, वडापाव, गुलाबजाम, भेळ, पॉपकॉर्न, मिसळपाव,नूडल्स, पावभाजी, इडली यासह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी मांडले होते. पालकांसह नागरिकांनी खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांकडून खरेदी केली व त्यांचा आनंद द्विगुणित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *