गौ टेक 2026 आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन पुण्यात आयोजित:गौ आधारित उद्योग, तंत्रज्ञान, संशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळेल




पुण्यात ‘गौ टेक 2026’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 23 मार्च 2026 दरम्यान पुण्यातील अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंडवर हा भव्य कार्यक्रम पार पडेल. गौ आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेत देश-विदेशातील धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल या संकल्पनांना बळकटी देईल. ‘गौ टेक 2026’ महोत्सवात 300 हून अधिक स्टॉल्स, विविध परिसंवाद, B2B बैठका आणि विदेशी प्रतिनिधींचा सहभाग असेल. भारतीय संस्कृतीत गौमातेला कामधेनू मानले जाते आणि तिच्या उत्पादनांचे केवळ धार्मिकच नव्हे, तर औद्योगिक आणि पर्यावरणीय महत्त्वही मोठे आहे. हा कार्यक्रम भारताच्या ‘ब्राऊन रिव्होल्यूशन’ला जागतिक स्तरावर पोहोचवेल. यातून महिलांसाठी रोजगार निर्मिती, स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य केले जाईल. दूध, गौमूत्र, शेण आणि पंचगव्य यांसारख्या गौ उत्पादनांवर आधारित उद्योगांना चालना मिळेल. या महोत्सवात गौशाळा, पशुवैद्यकीय महाविद्यालये, जैविक शेती आणि बायो-फ्युएल या क्षेत्रातील नवनवीन संशोधनांचा सखोल अभ्यास केला जाईल. तसेच, गौ-आधारित उत्पादने, बायोफर्टिलायझर्स, बायोपेस्टिसाइड्स आणि गोबर व गौमूत्रावर आधारित अनेक उद्योगांची प्रदर्शने भरवली जातील. ‘गौ टेक 2026’ ला महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे विशेष सहकार्य लाभले आहे. भारत सरकारच्या MSME मंत्रालयाने या कार्यक्रमास मान्यता दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक उद्योगसमूह, सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे समर्थन मिळाले आहे. या आयोजनामुळे गौ आधारित उद्योगांना जागतिक गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे. ‘गौ टेक 2026’ हे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनून भारताला आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकेल, अशी अपेक्षा आहे. या पत्रकार परिषदेत जीसीसीआयचे संस्थापक डॉ. वल्लभभाई कथीरिया यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘गौ टेक 2026’ चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदडा, जीसीसीआयचे जनरल सेक्रेटरी मित्तल खेतानी, रमेशभाई घेटीया, डॉ. दिलीप कुलकर्णी, मंगल अकोले, महेश लुहार, विनायक बोरोलें पाटील आणि कौस्तुभ देशपांडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *