नांदेड – वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यभर “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य, नाट्य, कविता आणि सामाजिक जाणीव जागृतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून विकसित व्हावी यासाठी त्यांनी केलेले अथक परिश्रम, तसेच त्यांच्या साहित्यकृतींमधून व्यक्त झालेली सामाजिक बांधिलकी यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीनाही अभिवादन करण्यात आले. सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी निधन झाले असून २७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अंत्ययात्रेचा दिवस स्मरणदिन म्हणून पाळला जातो. मराठी भाषेला अनेक नवे शब्द देऊन तिची अभिव्यक्ती अधिक प्रभावी व समृद्ध करण्याचे कार्य सावरकरांनी केले, याची उपस्थितांनी यावेळी आठवण करून दिली. या कार्यक्रमास डॉ. संतुकराव हंबर्डे, इंजि. अनिल मळगे, डॉ. बालाजी गिरगांवकर, डॉ. विजय नवघरे तसेच प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे, दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आणि पुढील पिढीपर्यंत भाषेची समृद्ध परंपरा जपण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मराठी कविता वाचन व भाषण सादर करून भाषेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. संपूर्ण परिसर मराठी भाषेच्या अभिमानाने आणि उत्साहाने भारावून गेला होता.
Post Views: 6
