![]()
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी भाषणाची सुरुवात करताना त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले, आज आपल्या मातृभाषेचा दिवस. आपण सगळे मराठी बोलणारे मराठी आईची मुलं आहोत, त्यामुळे आपल्यासाठी रोजच मराठी दिवस असला पाहिजे. एक अप्रतिम कार्यक्रम आपण आज अनुभवला, जादूची पेटी. आपल्या आयुष्यात मत पेटी आहे. राजकारण्यांच्या थापा आपण रोजच बघतो, त्यामुळे ढोलकीवरची थाप कमी झाली आहे. शब्दावाचून काय काय कळू शकते, हे शब्द आणि सूरातून कळते. पेटी माझ्यासाठी नवीन नाही, कारण माझे काका श्रीकांतजी ठाकरे हे पेटी वाजवायचे. त्यांच्यासमोर सगळे दिग्गज गायक घरी यायचे. मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांनी मराठी गाणे गाऊन घेतले होते. मोहम्मद रफी यांना मराठी गाणे नीट कळावे म्हणून काकांनी त्यांना उर्दूमध्ये गाणे लिहून दिले होते. त्यांना उर्दू सुद्धा यायची. हे मी का सांगत आहे, कारण कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. फक्त आमच्यावर लादू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना टोला मराठीसाठी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्याचे क्रेडिट घेत आहेत. माझ्यामुळे दोन भाऊ एकत्र आले. असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी विंदा करंदीकर यांच्या कवितेचे उदाहरण देत टोला लगावला. मला एका गोष्टीचे समाधान आहे आणि अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. काल सुद्धा पुन्हा त्यांची सवय काय आहे की जुने दळण दळत बसायचे. इतके दळायचे की लोकांना ते खरे वाटायला लागते. मातृभाषेचे भवन उभे करायला मुहूर्त शोधायला लागतोय? महाराष्ट्र आणि बंगालला रंगभूमीची परंपरा आहे. इकडे दादरच्या चौपाटीला मी रंगभूमीची माहिती सांगणारे दालन उभे करणार होतो. रद्द करून टाकले आणि बिल्डरचे घशात टाकले. भाजपचे ऑफिस उभे राहत आहे, तेही भूखंड ढापून. पण माझ्या मातृभाषेचे भवन उभे करायला मुहूर्त शोधायला लागतोय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. कसले तुम्ही मुख्यमंत्री? कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री? एक नक्की आहे की महाराष्ट्राला एका प्रादेशिक पक्षाची गरज आहे आणि शिवसेना आहेच. मराठी माणसाची एक वृत्ती आहे की तो स्वार्थ कधी बघत नाही. हा गुण आहे की दोष आहे, हे कळत नाही. हिमालयच्या मदतीला सह्याद्री धावून जातो. हिमालय चालू आहे, डोक्यावर बर्फ आहेच. थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो आणि नंतर सोडून देतो, असेही ठाकरे म्हणाले. आमच्या घरावर मालकी सांगायला लागले तर कसे सहन करणार? पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज गरज आहे. जसे बंगालमध्ये ममता उभ्या आहेत आणि दिल्लीची नजर सुद्धा होत नाही त्यांच्याकडे पाहण्याची. आम्हाला भाषेचा अभिमान आहेच, पण देशाचा अभिमान जास्त आहे. भाषावार प्रांतरचना झाली, आम्हाला महाराष्ट्र मिळाला, त्याला राजधानी मिळाली. पण इथे येऊन आमच्या घरावर मालकी सांगायला लागले तर कसे सहन करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदी गाणी प्रसिद्ध मराठी माणसाने केली आता मला भीती वाटायला लागली आहे की आपले राष्ट्रगीतही मारतात की काय? अशी भीती उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. हिंदी गाणी प्रसिद्ध मराठी माणसाने केली. मंगेशकर घराणे आहे. या महाराष्ट्राने लोकप्रियता मिळवून दिली आहे. शिवसेना नसती तर मराठी माणसाची हालत त्यांच्या घरात काय झाली असती? त्यांना विचारा मराठी माणसासाठी कधी रस्त्यावर उतरला का? आपले दैवत एकच आहे. आपण आदलाबदल करणारे नाही आहोत. मनाचे श्लोक रोज वाचले तर कोणी भाजपमध्ये जाणारच नाही उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना आजपर्यंत समाजसेवा करत आली आहे. कारण शिवसेना प्रमुखांनीच सांगितले होते 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण. अपघात, घातपात झाला तर अॅम्ब्युलन्स घेऊन मदतीला धावून जाणारा शिवसैनिक असतो. हे लोक आम्हाला येऊन हनुमान चालिसा शिकवता. का? मारुती स्तोत्र नाहीये? हनुमान चालिसाही म्हणा पण मारुती स्तोत्र आपल्याकडे आधीपासून आहे. आजकाल काही लोक भगवद्गीता सांगायला लागले आहेत. आपल्याकडे भगवद्गीतेचा अर्थ लहान वयातच संत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवला आहे. आजही अनेकांना त्याचा अर्थ समजत नसेल. मनाचे श्लोक आहेत. ते रोज वाचले तर कोणी भाजपमध्ये जाणारच नाही. कारण जगायचे कसे हे त्यात सांगितले आहे.
महाराष्ट्राला शिवसेनेचीच गरज- उद्धव ठाकरे:भाजपवर निशाणा साधत म्हणाले- सह्याद्री मदतीला जातो अन् हिमालय वापर करून सोडून देतो
