अमरावतीकर रमले आशा-सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांमध्ये:संस्कार भारतीच्या 'आशा सुमनांजली' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद




अमरावती | संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शनिवारी रात्री ‘आशा-सुमनांजली’ या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार भारतीची महानगर शाखा आणि अमरावती महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या लोकप्रिय गीतांनी अमरावतीकरांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या ध्येय गीताने झाली. प्रा. डॉ. जयश्री वैष्णव, आशुतोष देशपांडे, प्रा. डॉ. सोनाली शिलेदार, शीतल भट, केतकी मोहदरकर-देशपांडे, शुभम पांडे, आदित्य खारोकर, कोमल ढोके, श्रावणी भडके आणि ऋचा ठाकरे-बडनखे या गायकांनी आपल्या प्रभावी गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी आशा भोसले यांनी अजरामर केलेली ‘जय शारदे वागीश्वरी’, ‘गोरी गोरी पान’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारखी गाणी सादर झाली. तसेच, सुमन कल्याणपूर यांची ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘जिथे सागरा’ आणि ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ यांसारखी रसिकप्रिय गाणीही गायकांनी सादर केली. रसिका वैष्णव, रसिका वडवेकर-वानखडे आणि नितीन भट यांनी निवेदनाची बाजू समर्थपणे सांभाळत कार्यक्रमाची रंगत वाढवली. रसिकांनी तुडुंब भरलेल्या सांस्कृतिक भवनात तब्बल तीन तास हा सुरेल प्रवास अव्याहतपणे सुरू होता. नव्या आणि जुन्या पिढीतील गायकांनी आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांची कालातीत गाणी दमदारपणे सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाच्या अखेरीस ‘अभी न जाओ छोडकर’ या गीतात सुरेश भट यांच्या आशाबाईंवरील कवितेच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष उंची दिली. कार्यक्रमाची सुरुवात महापालिकेचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले, सभागृह नेते चेतन गावंडे आणि स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सभागृहाच्या कॅफेटेरिया परिसरात संध्या देवळे, स्वप्नील जोशी, विदुला जोशी, शीतल पटेरिया, शर्वरी धनोकर आणि अपूर्वा उमप यांनी साकारलेली आशाबाई आणि सुमनताई यांची रांगोळी लक्षवेधी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *