![]()
नशिराबादजवळील पोलिस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही गंभीर समस्या कायम असतानाही टोल वसुली निर्विघ्नपणे सुरू असल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट नशिराबाद टोल नाका गाठून काही काळासाठी टोल वसुली बंद पाडली. या आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरताच मोफत मार्गस्थ करण्यात आले. जोपर्यंत बोगद्याखाली साचलेले पाणी काढून वाहतुकीची सुरक्षित व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत टोल वसुली थांबवावी अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. हायवे प्रशासन आणि संबंधित टोल कंपनी नियमितपणे टोल वसूल करते, मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अशा गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करते, असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणाने वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. एकीकडे टोलची वसुली सुरू आणि दुसरीकडे पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने संताप अखेर टोल नाक्यावर उसळल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनामुळे काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. त्यावर उद्या मी स्वतः प्रत्यक्ष येऊन परिस्थितीची पाहणी करतो असे ठोस आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व काही वेळानंतर टोल वसुली पुन्हा पूर्ववत सुरू झाली. आंदोलनात नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, सभापती लालचंद पाटील, नगरसेवक प्रदीप बोढरे यांच्यासह नशिराबाद परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आंदोलन:नशिराबादजवळ पाण्याच्या साचण्यावरून नागरिक आक्रमक
