बालकामगार निर्मूलनासाठी नांदेड जिल्ह्यात चित्रकला व निबंध स्पर्धा
१६ तालुक्यांतील १६ केंद्रांवर उद्या स्पर्धा; विद्यार्थ्यांमध्ये बालहक्कांविषयी जनजागृतीचा उपक्रम
नांदेड, प्रतिनिधी : बालकामगार या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करून बालहक्कांचे संरक्षण आणि शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, नांदेड यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत १६ परीक्षा केंद्रांवर ही स्पर्धा पार पडणार आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी सकाळी ९.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांचे अथवा शिक्षकांचे प्रमाणपत्र सोबत आणावे. तसेच स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्वतः आणावे. चित्रकलेसाठी चित्रपत्रिका आणि निबंधासाठी कागद कार्यालयामार्फत पुरविण्यात येणार आहे. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत ३०० ते ४०० शब्दांत लिहिता येणार आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेनंतर अधिकृत पॅनेलमार्फत उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातून चित्रकला आणि निबंध स्पर्धेसाठी प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय पुढील फेरीसाठी निवड होईल. त्यानंतर अंतिम फेरीत दोन्ही स्पर्धांमधून प्रत्येकी तीन, असे एकूण सहा विद्यार्थी निवडले जाणार आहेत.
अंतिम सहा विद्यार्थ्यांसह १६ तालुक्यांतील एकूण ९६ पात्र विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
बालकामगारमुक्त समाजनिर्मितीसाठी लोकसहभाग आवश्यक
बालकामगारांविरोधात जनजागृती होऊन विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क, शिक्षणाचे महत्त्व आणि बालकामगार निर्मूलनाबाबत जागरूकता वाढेल. या उपक्रमामुळे बालकामगारमुक्त समाजनिर्मितीसाठी लोकसहभाग वाढण्यास मदत होईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त, नांदेड आशिष ढवळे यांनी सांगितले.
