दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक:दोन मोटारसायकलींसह 2 लाख रुपयांचे साहित्य जप्त




मोर्शी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलींसह सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी पहाटे गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. मोर्शी-वरूड रोडवरील वारकरी ढाब्याजवळ दोन मोटारसायकलींवर चार संशयित इसम थांबले असून, ते गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी सापळा रचून धाड टाकली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे उमेश कैलास वटके (रा. राजूरानाका), सागर नरेंद्र खोब्रागडे (रा. सुरळी, ता. वरूड), गजानन बनसिलाल उईके (रा. हरिओम नगर, वरूड) व रामपाल संतुलाल वटके (रा. विकासनगर, वरूड) अशी सांगितली. आरोपींकडून बजाज कंपनीच्या दोन विनाक्रमांकाच्या मोटारसायकली, एक लोखंडी पेंचिस, एक मोठा पेचकस, एक काठी आणि एक लोखंडी रॉड असा सुमारे २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोहळे यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *