![]()
पुण्यातील नादसप्तक संगीत विद्यालयाने ‘सूर पहाडी’ या विशेष मैफलीचे आयोजन केले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.११ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही मैफल होणार आहे. भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत परंपरेतील लोकप्रिय राग पहाडीवर आधारित १११ हिंदी आणि मराठी गीतांचे सादरीकरण यात केले जाईल. या कार्यक्रमाद्वारे एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रख्यात गायक आणि संगीतकार गिरीश पंचवाडकर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन केले आहे. पुण्यातील संगीत, कला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या मैफलीत गिरीश पंचवाडकर यांच्यासह नादसप्तक संगीत विद्यालयाचे २५ विद्यार्थी गाणी सादर करतील. संगीत संयोजनात प्रसिद्ध युवा तबलावादक आणि विद्यालयाचे संचालक अक्षय पंचवाडकर, ज्येष्ठ कीबोर्ड वादक रशीद शेख, तसेच नागेश भोसेकर, प्रसन्न बाम, सचिन वाघमारे, रोहित साने आणि आदित्य निरगुडे या नामवंत वादकांचा सहभाग असेल. १९ ते ९९ वयोगटातील कलाकारांच्या सहभागाने सादर होणाऱ्या या कार्यक्रमात राग पहाडीवर आधारित भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, लावणी, अभंग, तसेच संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत रामदास यांच्या अभंगांचा समावेश असेल. मराठी व हिंदी चित्रपट संगीतासोबतच शास्त्रीय पहाडी सरगम आणि तराणा हे देखील विशेष आकर्षण ठरणार आहे. लोकप्रिय इन्फ्लुएंसर आणि रील स्टार अथर्व सुदामे हे विशेष पाहुणे कलाकार म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पुणेकर रसिकांसाठी ही मैफल स्वरांची एक अविस्मरणीय पर्वणी ठरेल, असे आयोजकांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, सर्वांनी या मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन नादसप्तक संगीत विद्यालयाने केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जोशी, नीरज फडके, रूपा इनामदार, दीपश्री डोळे, मयुरी देशपांडे, आदिती ताले, धवल ताले, गायत्री उंब्रजकर, भारत कोकीळ आणि रोहित परांजपे हे परिश्रम घेत आहेत.
नादसप्तक विद्यालयाची १११ गीतांची विक्रमी मैफल:'सूर पहाडी' कार्यक्रमातून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न
