![]()
पुणे सायबर गुन्हे शाखेने दोन कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात कर्नाटकातून दोन सायबर चोरट्यांना अटक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अजय रामविलास यादव (वय २२) आणि सलमान गौस मोहियुद्दीन अजनाल (वय ३२, दोघे रा. कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी एका नामांकित कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर समाज माध्यमातील खात्यांमध्ये केला होता. त्याद्वारे ते कंपनीच्या ग्राहकांशी संपर्क साधून, पैसे थकले असून तातडीने जमा करण्याची मागणी करत होते. ग्राहकांनी संदेशाची खातरजमा न करता आरोपींच्या खात्यात पैसे जमा केले. अशा प्रकारे चोरट्यांच्या खात्यात एकूण १ कोटी ९५ लाख रुपये जमा झाले होते. या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे अनेक ग्राहक बळी पडले. तांत्रिक तपासामध्ये आरोपींचे बँक खाते कर्नाटकातील बेळगाव भागातील एका बँकेत असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांच्या पथकाने बेळगाव परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडून तीन मोबाइल संच, बँकेची खातेपुस्तिका आणि डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अशाच पद्धतीने फसवणुकीचे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी समाज माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही संदेशाबाबत खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. काही संशयास्पद आढळल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, उपनिरीक्षक सुशील डमरे, संदीप कणसे, प्रवीणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, शीतल डांगरे आणि अनिकेत भिंगारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दोन कोटींची फसवणूक, कर्नाटकी सायबर चोरटे जेरबंद:कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर करून ग्राहकांना फसविले, गुन्हा दाखल
