![]()
‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतही घोळ झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने गुरुवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना निवेदन सादर करण्यात आले. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ आणि अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्यात सीईटी सेल, परीक्षा मंडळ तसेच एमपीएससी आणि देशात ‘एनटीए’ सारख्या यंत्रणांमार्फत विविध स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात. मात्र, या यंत्रणांचे कामकाज अत्यंत खेदजनक बनले आहे. एनटीएने घेतलेल्या ‘नीट’ परीक्षेत मोठा गोंधळ झाला, ज्यावरून बराच गहजब झाला होता. दिल्लीच्या जंतर-मंतरवर त्यासाठी ३६ दिवस आंदोलन सुरू होते. ते आंदोलन संपत नाही, तोच आता एमपीएससीने एफडीएसाठी घेतलेली ड्रग्ज इन्स्पेक्टरची परीक्षा वादात अडकल्याचे युवक काँग्रेसने निदर्शनास आणले. वारंवार वादग्रस्त ठरणाऱ्या या परीक्षांमुळे देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे, त्या तरुणांवर मोठा आघात होत आहे. बेरोजगार तरुण पुन्हा निराशेच्या खाईत ढकलले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. निवेदनाद्वारे सीईटी परीक्षा तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करून सूत्रधार, दलाल व संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा व पारदर्शक व्यवस्था लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली. दोषींची पाठराखण करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे, बडनेरा विधानसभा उपाध्यक्ष राहुल बागडे, धनंजय बोबडे, अभिषेक सवई, शुभम हिवसे, नितीन ठाकरे, चैतन्य गायकवाड, अभिषेक भोसले, साहिल वानरे, निशांत पवार, क्रिश बिसने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:'नीट' नंतर FDA परीक्षेत घोळ, कठोर कारवाईची मागणी
