नागपुरात बारावीचा पेपर फुटला:परीक्षेच्या तासाभराआधीच व्हॉट्सॲपवर केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका, खासगी शिकवणीतील शिक्षकावर संशय




राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेचे ‘केमिस्ट्री’ आणि ‘फिजिक्स’चे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघड झाला. परीक्षेदरम्यान एक विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेली होती. मात्र, १५ मिनिटे उलटूनही ती बाहेर न आल्याने पर्यवेक्षकांना संशय आला. तिची झडती घेतली असता तिच्याकडे मोबाईल सापडला. मोबाईलमधील व्हॉट्सॲप तपासले असता, ‘XII’ नावाच्या ग्रुपवर परीक्षेपूर्वीच सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी केमिस्ट्रीचा पेपर अपलोड करण्यात आला होता. या विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीवरून दुसऱ्या एका विद्यार्थिनीच्या बॅगेतूनही मोबाईल जप्त करण्यात आला. या दोन्ही विद्यार्थिनी एकाच ग्रुपच्या सदस्या आहेत. खासगी शिक्षकाचे ‘कनेक्शन’; २१ विद्यार्थी रडारवर प्राथमिक चौकशीत विद्यार्थिनींनी असा दावा केला आहे की, एका खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने पैशांच्या बदल्यात हा पेपर फोडला होता. ज्या ‘XII’ व्हॉट्सॲप ग्रुपवर हे पेपर शेअर करण्यात आले, त्यामध्ये एकूण २१ विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा देत असून, आता या सर्वांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. या व्यवहारात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाची मोठी कारवाई या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कठोर पावले उचलली आहेत. सेंट उर्सुला केंद्रावरील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची तातडीने दुसऱ्या केंद्रावर बदली करण्यात आली आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. “संबंधित सर्व विद्यार्थ्यांची आणि संशयास्पद व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल,” असे नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी स्पष्ट केले. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल एक तास आधीच (सकाळी १०:३७ वाजता) केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सॲपवर फिरत होता. बोर्डाच्या कडक सुरक्षेचे दावे फोल ठरल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. नागपूर पोलिसांचे सायबर सेल आता या व्हॉट्सॲप ग्रुपच्या मास्टमाइंडचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *