![]()
चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत हनुमानढाणा गावात एका बालिकेचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या गंभीर घटनेनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी तातडीने दखल घेतली. गुरुवारी सकाळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी दोन अधिकाऱ्यांसह एकूण तिघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चिखलदरा पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी आणि हनुमानढाणा गावाचे ग्रामसेवक हे तिघे रडारवर आहेत. हनुमानढाणा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, प्रत्यक्ष नळ कनेक्शन न दिल्याने नागरिकांना घरासमोरून जाणाऱ्या पाईपलाईनपर्यंत खड्डा खोदून पाणी मिळवावे लागते. गावात आठ-दहा घरांमागे एक खड्डा अशी स्थिती आहे. अशाच एका तीन फूट खोल खड्ड्यात बुडून बुधवारी एका बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषद प्रशासनाच्या मते, संबंधित कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडून ही बाब दुर्लक्षित राहू नये अशी अपेक्षा होती. पावसाळ्यापूर्वीच हे खड्डे बुजविण्याची कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. या निष्काळजीपणाबद्दल तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंत्यांना थेट सीईओंकडे, तर विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांना चिखलदरा बीडीओंकडे लेखी खुलासा सादर करावा लागणार आहे. संबंधितांच्या स्पष्टीकरणानंतरच या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, हे निश्चित केले जाईल. या प्रकरणी पाणी पुरवठा योजनेच्या जबाबदारीवरूनही चर्चा सुरू आहे. सध्याची पाणी पुरवठा योजना काही वर्षांपूर्वीच ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली असल्याने थेट जबाबदारी ग्रामपंचायतीची येते, असा एक मतप्रवाह आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनाचा तर्क आहे की, ही योजना लवकरच बंद होणार असून तेथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत नवीन योजना (जलजीवन मिशन) कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जुन्या योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च का करायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या तर्क-वितर्कांमध्ये एका बालिकेचा जीव गेला, हे सत्य आहे. चौकशीअंतीच या प्रकरणातील सत्य समोर येईल.
खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू प्रकरण:जिल्हा परिषद सीईओंकडून दखल, कनिष्ठ अभियंत्यासह तिघांना ‘शो कॉज’ नोटीस
