![]()
संगणकापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व तंत्रज्ञानामध्ये अनिवार्य असलेल्या सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये देशात आघाडी घेण्याची क्षमता महाराष्ट्राकडे आहे. व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड (VLSI) सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सत्या गुप्ता यांनी ही माहिती दिली. या
.
सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या व्हीएलएसआय सोसायटीची ‘३९ वी व्हीएलएसआय डिझाइन आंतरराष्ट्रीय परिषद २०२६’ आणि ‘२५ वी आंतरराष्ट्रीय एम्बेडेड सिस्टम्स परिषद’ पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला देशभरातून अडीच हजारांहून अधिक प्रतिनिधी आणि साडेपाचशे विद्यार्थी उपस्थित आहेत. परिषदेच्या उद्घाटन सत्रानंतर डॉ. गुप्ता यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी शैलेश परब, रणजित येवले आणि संजय घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. गुप्ता यांनी सांगितले की, सध्याच्या काळात सर्व क्षेत्रांत उपयोगात आणल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये सेमीकंडक्टर हा घटक अनिवार्य आहे. महाराष्ट्रात सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि अन्य सर्व आवश्यक घटक उपलब्ध आहेत. या क्षेत्राला गती देण्यासाठी उद्योग, शिक्षण संस्था आणि शासनाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, त्या दृष्टीने सोसायटीने पुढाकार घेतला आहे.
केंद्र सरकारबरोबरच आसाम, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचे सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्राशी संबंधित धोरण निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात हे धोरण निश्चित करण्याचे काम सुरू असून, सरकारकडून याबाबत अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रासाठी सर्वाधिक अनुकूलता असल्याचे डॉ. गुप्ता यांनी अधोरेखित केले.
सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात आयटीआय प्रशिक्षित तंत्रज्ञांपासून पदविका आणि पदवीधारक अभियंत्यांपर्यंत सर्वांना रोजगाराच्या संधी आहेत. सेमीकंडक्टर डिझाइन आणि प्रत्यक्ष उत्पादन यासाठी सध्या अनेक शिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, या नव्याने उदयाला येत असलेल्या क्षेत्राबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये अद्याप पुरेशी माहिती नाही. या क्षेत्रात सॉफ्टवेअर क्षेत्रापेक्षाही अधिक आकर्षक संधी उपलब्ध असल्याबद्दलची जाणीव शालेय स्तरापासूनच विद्यार्थी आणि पालकांना करून देणे आवश्यक आहे.
यासाठी विविध शिक्षण संस्थांच्या सहकार्याने व्हीएलएसआय सोसायटी प्रयत्नशील आहे. सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात विद्यार्थी घडवण्यासाठी सोसायटीने प्राधान्य दिले असून, आगामी पाच वर्षांत ५० हजार प्रशिक्षित मनुष्यबळ घडवण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. तसेच, विद्यार्थ्यांना स्वतः सेमीकंडक्टर बनविण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्थांना संस्थेच्या वतीने अनुदानही देण्यात येणार असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, या परिषदेत विविध कंपन्या आणि संस्था सहभागी झाल्या असून, अनेक परिसंवाद यामध्ये होणार आहेत. ही परिषद ७ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
