नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवरील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दिमाखात प्रवाहित झाला आहे. धबधब्याने पुन्हा एकदा रौद्र आणि मनमोहक रूप धारण केल्याने पर्यटकांची पावले सहस्रकुंडकडे वळू लागली आहेत.
यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीला साधारण पूर आला आहे. परिणामी सहस्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडेच होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे किनवट, माहूर आणि हिमायतनगर तालुक्यांत अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. काही ग्रामीण भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला. डोंगराळ भागातील ओढ्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क काही काळ विस्कळीत झाला.
या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरणे, तलाव आणि बंधाऱ्यांतील पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झाल्याची माहिती मिळताच परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान असल्याने नागरिकांनी व पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावे, पुराच्या पाण्यात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांतही जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
Post Views: 56
