![]()
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर धावत्या ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी १०:१५ वाजता ही दुर्घटना घडली. निरंजन लक्ष्मण फिरके (वय ४०) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय ३७, दोघे रा. सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे फिरके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सावनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रेनच्या धडकेमुळे दोन्ही भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका भावाचे दोन्ही हात तुटले, तर दुसऱ्याचे शीर धडावेगळे झाले होते. घटनास्थळावरील नागरिकांनी हा थरारक प्रसंग पाहून धक्का बसल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हीतेश बनसोड यांना अंकित हांडे यांनी संपर्क साधला. बनसोड यांनी तात्काळ सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिसांचे पथक ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. ‘हितज्योती आधार फाउंडेशन’च्या चमूने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने रेल्वे रुळावरून मृतदेह उचलून सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. दोघे भाऊ रेल्वे रुळावर कसे आले आणि हा अपघात नेमका कसा घडला, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. सावनेर पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून शवविच्छेदन अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.
सावनेरमध्ये भीषण अपघात:रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, रुळावरून जाताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ
