किनवट (प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा हायवा, त्याला मदत करणारी कार आणि मोबाईलसह एकूण 49 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालकासह दोघांविरुद्ध बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बारड चौकात नाकाबंदी करून MH-26-CV-9992 क्रमांकाचा हायवा अडवून तपासणी करण्यात आली. वाहनात सुमारे पाच ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक रॉयल्टी अथवा वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत वाहनमालक तसेच MH-26-CE-7716 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून मोबाईलद्वारे लोकेशन देऊन अवैध रेती वाहतुकीस मदत केली जात असल्याचे उघड झाले.या कारवाईत अंदाजे 40 लाखांचा हायवा, पाच ब्रास रेती, स्विफ्ट डिझायर कार, दोन मोबाईल असा एकूण 49.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बारड पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी चंद्रशेखर कदम व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील मोहिम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
