कंधार पोलिसांची मोठी कारवाई; ८.८८ लाखांचा अवैध गुटखा आणि कार जप्त


नांदेड (प्रतिनिधी) –  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कंधार पोलिसांनी १९ जुलै २०२६ रोजी मोठी कारवाई करून ८,८८,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सापळा रचून केली कारवाई कंधार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, एका चारचाकी वाहनातून डिग्रस (बु.) मार्गे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने डिग्रस (बु.) रोड परिसरात सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली.

भरधाव कारचा थरारक पाठलाग तपासणी दरम्यान एक पांढऱ्या रंगाची टोयोटा इटिओस कार (क्र. MH-48-BH-0634) संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन न थांबवता ते वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत या वाहनाचा पाठलाग करून ते अडवले आणि चालकाला ताब्यात घेतले.

जप्त केलेला मुद्देमाल पंचांसमक्ष वाहनाची सखोल झडती घेतली असता, त्यात खालील मुद्देमाल आढळून आला:

  • प्रतिबंधित गुटखा: ३,०५,७६० रुपये
  • तंबाखू: १,३१,०४० रुपये
  • विमल व रजनीगंधा पानमसाला: ५१,८४० रुपये
  • टोयोटा इटिओस कार: ४,००,००० रुपये असा एकूण ८,८८,६४० रुपयांचा साठा आणि वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल या प्रकरणी अमर संजय कांबळे (वय २६, रा. डिग्रस (बु.), ता. कंधार) आणि बाळू वडजे यांच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, ३(५) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घोडके, सपोनि कोकाटे, अंमलदार प्रकाश टाकरस, एकनाथ घुगे, कामठेवाड  यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास कंधार पोलीस करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *