![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी जोरदार टीकास्त्र सोडले. डिलिमिटेशन विधेयक, पक्षफोड, हिंदुत्व आणि घराणेशाही या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत, “सरकारला घटना बदलायची आहे, म्हणून खासदार आणि राजकीय पक्ष फोडले जात आहेत,” असा गंभीर आरोप केला. मुंबईत आयोजित ‘मार्मिक प्रबोधन शतक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवले. ‘डिलिमिटेशनसाठी खासदार फोडले जात आहेत’ डिलिमिटेशन विधेयकाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून जाणीवपूर्वक राजकीय पक्ष आणि खासदार फोडण्याचे काम सुरू आहे. “सरकारला घटनात्मक बदल करायचे आहेत. त्यासाठी संसदेत आवश्यक संख्याबळ मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘काम झाल्यावर मित्रपक्षांनाही दूर केले जाते’ भाजपच्या राजकीय कार्यपद्धतीवर टीका करताना ठाकरे म्हणाले, “हे लोक राजकीय पक्षांचा गरजेनुसार वापर करतात आणि काम संपले की त्यांनाच दूर फेकून देतात.” सत्तेसाठी कोणत्याही मर्यादा ओलांडल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘रामाच्या नावावर सत्ता, पण मंदिराची लूट’ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. “ज्या प्रभू रामाच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली, त्याच रामाच्या मंदिरात गैरव्यवहार होत असताना तुम्हाला लाज वाटत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही मांडला की आम्हालाच हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातो. पण स्वतः भाजपने कोणती मूल्ये जपली, हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. “आम्ही हिंदुत्व सोडल्याचे सांगणाऱ्यांनी आधी स्वतः काय जपले होते, याचे उत्तर द्यावे. लाज, शरम आणि नैतिकता आधीच सोडून दिलेल्यांनी आम्हाला उपदेश करू नये,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. आमच्या कुटुंबाची शंभर वर्षांची परंपरा भाजपकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांनाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. “होय, आमच्याकडे घराणेशाही आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आमच्या कुटुंबाची शंभर वर्षांची सामाजिक आणि सार्वजनिक परंपरा आहे,” असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, “त्यांच्या घराण्याचा इतिहास काय आहे? ते कुठून आले, त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा झाला, याचा कोणताही मागोवा नाही,” अशी टीका केली. ‘देशाची जबाबदारी कोण घेणार?’ पंतप्रधान मोदी यांच्या पूर्वीच्या वक्तव्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, “‘मेरा क्या, मैं तो झोला लेकर निकल जाऊंगा’ असे म्हणणे सोपे आहे; पण देशाचे पुढे काय होणार, याचाही विचार झाला पाहिजे.” देशाच्या भवितव्याची जबाबदारी ही केवळ घोषणांनी पूर्ण होत नसून त्यासाठी उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘अन्यायाविरोधात लढणे हीच शिवसेनेची परंपरा’ भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेचाही पुनरुच्चार केला. “कौतुक ऐकत बसणे हा ठाकरे कुटुंबाचा स्वभाव नाही. अन्याय आणि ढोंगाविरोधात उभे राहणे, सत्याच्या बाजूने ठामपणे लढणे हीच आमची परंपरा आहे. शिवसेना आजही त्याच विचारांवर ठाम असून पुढेही त्याच मार्गाने वाटचाल करेल,” असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून, त्यांच्या आरोपांना भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आमच्या घराण्याला शंभर वर्षांचा इतिहास:तुमच्या घराण्याचा इतिहास काय? कुठून आलात? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
