पुणे ग्रामीणमध्ये ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी:7 दिवस आधी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक




पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यानुसार, कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन किंवा छायाचित्रण व्यावसायिकांना ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यास सात दिवस आधी माहिती देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असेल. हे प्रतिबंधात्मक आदेश पुणे जिल्ह्यातील संवेदनशीलतेमुळे जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे आणि केंद्रीय संस्था आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी करून त्याचा उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आदेशात नमूद केले आहे. याशिवाय, दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफियांकडून टेहळणीसाठी ड्रोनचा वापर होण्याची आणि इतर प्रकारच्या चोऱ्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरा वापरण्यासाठी सात दिवसांपूर्वी पोलीस ठाण्याला माहिती देऊन परवानगी घेणे आवश्यक आहे. संबंधित आदेशाचा भंग करून पोलिसांच्या परवानगीशिवाय ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करताना आढळल्यास संबंधित व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २३३ नुसार कारवाईस पात्र राहील, असे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *