Prakash Shinde Clarification On Sushma Andhare Allegation Over Satara Drugs Case | राजकीय द्वेषापोटी शिंदे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न: ड्रग्ज प्रकरणातील गंभीर आरोपांनंतर प्रकाश शिंदेंची प्रतिक्रिया, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा – Maharashtra News



साताऱ्यातील जावळी तालुक्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नाव गोवल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे आता आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आरोप प्रकाश शिंदे

.

साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुंबई पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि ड्रग्ज बनविण्याचे साहित्य जप्त करत मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. सावरी येथे झालेल्या या कारवाईनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या ड्रग्ज निर्मिती रॅकेटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाचा सहभाग असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला होता. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देत, सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

छापा पडलेली जागा माझी नाहीच

माध्यमांसमोर आपली बाजू मांडताना प्रकाश शिंदे यांनी जमिनीच्या कागदपत्रांचा तपशीलच जाहीर केला. ते म्हणाले, “ज्या ठिकाणी एमडी ड्रग्जचा साठा आणि कारखाना सापडला, ती जागा (गट नं. ४/१) गोविंद शिंदकर या शेतकऱ्याची आहे. या जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या जमिनीचा सातबारा क्रमांक १७/१ आणि ३०/१० (वडिलोपार्जित) असा आहे. विशेष म्हणजे घटनास्थळ आणि माझी जमीन यात तब्बल १५ किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आरोप करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्यावी.”

हॉटेल आणि रणजीत शिंदेंबाबत खुलासा

‘तेज यश’ रिसॉर्ट आणि जमीन व्यवहाराबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “सदर जागा आम्ही रणजीत शिंदे यांना विकली असून त्याचे कायदेशीर पुरावे उपलब्ध आहेत. रणजीत शिंदे दरे गावातच असून ते फरार नाहीत. तसेच त्या ठिकाणी कोणतेही फाईव्ह स्टार हॉटेल होणार नाही. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी तिथे कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा माझा मानस होता.”

शिंदे कुटुंबाला बदनाम करण्याचा कट?

“पोलिसांच्या चौकशीतून अनेक बाबी सिद्ध झाल्या आहेत. राजकीय द्वेषापोटी आमच्यावर आरोप केले जात आहेत. आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावणार आहे. तसेच आरोप मागे न घेतल्यास अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार,” असा इशाराही प्रकाश शिंदे यांनी दिला आहे.,

दोषींवर कठोर कारवाई करा

“या ड्रग्ज प्रकरणात जे कोणी खरे गुन्हेगार असतील, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आणखी कुणाचा संबंध असेल तर त्यांनाही अटक करा, पण निष्पापांची बदनामी थांबवा,” अशी मागणी प्रकाश शिंदे यांनी पोलिसांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *