दोष शोधून काम केल्यास ध्येय गाठणे सोपे:तरुण पिढी देशाचे बलस्थान, लेफ्टनंट जनरल हसबनीस यांचे 'आदर्श भारत' निबंध स्पर्धेत मार्गदर्शन




लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी नुकतेच येथे सांगितले की, समाजातील दोष शोधून त्यावर कार्य केल्यास ठरलेल्या उद्दिष्टांकडे वाटचाल करणे सोपे होते. तरुण पिढी हेच देशाच्या विकासाचे बलस्थान आहे. केवळ बोलण्यापेक्षा कृतीतून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?’ या विषयावरील निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. आचार्य सम्प्रसाद विनोद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, कौशलम् न्यास, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, कॉसमॉस फाउंडेशन आणि नागरी लिपी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हसबनीस यांनी यावेळी विकासासोबतच देश आदर्श व समर्थ असणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अशाच आदर्श व समर्थ भारताचे स्वप्न पाहिले होते. हेच स्वप्न देशातील प्रत्येक नागरिक आणि युवा पिढीच्या मनात आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी योजनाबद्ध कार्य आणि सकारात्मक विचारांची गरज असल्याचे हसबनीस यांनी नमूद केले. गेल्या वर्षी ‘राष्ट्रीय युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धा’ शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक अशा तीन विभागांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, संस्कृत आणि तेलगू या चार भाषांमध्ये निबंध सादर करण्यासाठी सुमारे ९०० स्पर्धकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३०० निबंध निवडण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक विभागात प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ अशा एकूण ३५ स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्वस्त प्रदीप रावत, स्पर्धेच्या संयोजिका लीना मेहेंदळे, परीक्षक शरद जोशी, धनेश्वरजी आणि भारतीय विद्या भवनचे संचालक नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल www.kyps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संयोजिका लीना मेहेंदळे यांनी सांगितले की, स्पर्धकांना तयारीसाठी उपयुक्त टिप्स मिळाव्यात आणि त्यांचा उत्साह वाढावा या उद्देशाने अनुभवी व्यक्तींचे विचार @nibandhkaushalam या यूट्यूब चॅनेलवर संकलित करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, लेफ्टनंट जनरल बक्शी आणि माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची विशेष व्याख्याने यासाठी उपयुक्त ठरली. या यूट्यूब चॅनेलचा उपयोग भविष्यात नव्या विषयांवर स्पर्धा घेण्यासाठीही केला जाईल. स्पर्धकांनी व्यक्त केलेले विचार संकलित करून ते केंद्र सरकारच्या निदर्शनास आणण्याचा आणि पुस्तकरूपाने जतन करण्याचा मानस असल्याचेही मेहेंदळे यांनी सांगितले. स्पर्धकांच्या वतीने नेदरलँड्स येथील राम तक्षक (हिंदी स्पर्धेचे विजेते) यांनी आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *