सोने देण्याचे आमिष; ६० लाखांची फसवणूक, पोलिस कर्मचाऱ्याचे नाव चर्चेत

नांदेड | प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, सोने देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपये रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचा उल्लेख अधिकृत अहवालात करण्यात आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ओमकार विश्वनाथ भुरे याने सचिन खेडकर यांना एक कोटी रुपयांचे सोने देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत सचिन खेडकर यांनी त्याला ६० लाख रुपये रोख दिल्याचे सांगितले जाते.

मात्र पैसे स्वीकारल्यानंतर ओमकार भुरे हा पोलीस अंमलदार राजेश बाबुराव मुंडे व त्याच्या दोन साथीदारांसह ती रक्कम घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील तपशील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल, एकाला अटक

या घटनेप्रकरणी गुन्हा क्रमांक २३/२०२६ भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ओमकार विश्वनाथ भुरे याला ताब्यात घेऊन लोहा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

पोलिस कर्मचाऱ्याचे नाव अहवालात, पण कारवाई प्रलंबित?

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात पोलीस अंमलदार राजेश बाबुराव मुंडे (रा. शंकर नगरी, असर्जन, नांदेड) व त्याचे दोन साथीदार यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तरीही उपलब्ध माहितीनुसार संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही किंवा अटक करण्यात आलेली नाही.

नागरिकांमध्ये संताप, चर्चांना उधाण

एका गंभीर आर्थिक गुन्ह्यात पोलिस कर्मचाऱ्याचे नाव समोर येऊनही त्याच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेच्या भूमिकेबाबत विविध चर्चांना उधाण आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *