मुंबई (विशेष प्रतिनिधी)- मंत्रालयाच्या गुळगुळीत कॉरिडॉरमध्ये फाईलपेक्षा सेटिंग जास्त वेगाने फिरते, हे पुन्हा सिद्ध झाले. प्रशासकीय व्यवस्थेच्या गंजलेल्या कुलपांवर हातोडा मारणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांतली तब्बल २४ वी बदली अखेर झालीच. म्हणजे सरळ भाषेत काम करा आणि बदली घ्या, हा महाराष्ट्र प्रशासनाचा अघोषित नियम पुन्हा लागू!
ज्यांच्या कामाचं कौतुक करताना अधिवेशनात शब्द संपत नव्हते, त्याच अधिकाऱ्याला अचानक दिव्यांग कल्याण विभागातून उचलून मदत व पुनर्वसन विभागात टाकलं. म्हणजे कौतुक स्टेजवर आणि बदली बॅकस्टेज हा सरकारी नाटकाचा जुना पण हमखास हिट फॉर्म्युला!
खोट्या प्रमाणपत्रांच्या साम्राज्यावर मुंढेंचा हल्ला
दिव्यांग कल्याण विभागात रुजू होताच मुंढेंनी फाईल उघडली आणि अनेकांचे घाम फुटले. कारण त्यांनी हात घातला तो थेट बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या रॅकेटला. सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या कागदी दिव्यांगांचा खेळ संपवायचा निर्धार त्यांनी केला.
आणि मग काय… वर्षानुवर्षे आरामात बसलेल्या पांढरपेशा मंडळींच्या खुर्च्या हलायला लागल्या. ज्यांनी सिस्टमला स्वतःची खासगी मालमत्ता समजलं होतं, त्यांना पहिल्यांदाच नियम नावाची गोष्ट आठवली. मुंढे फाईल तपासत नव्हते ते मुखवटे फाडत होते! म्हणूनच मंत्रालयात कुजबुज सुरू झाली हा माणूस जास्त प्रामाणिक आहे… धोकादायक आहे!
कौतुकाची माळ आणि बदल्याचा फास
एका बाजूला मुख्यमंत्री सभागृहात उभं राहून मुंढेंच्या कामाचं कौतुक करत होते, तर दुसऱ्या बाजूला काही अदृश्य शक्ती त्यांच्या बदल्याची फाईल तयार करत होत्या. म्हणजे सिस्टीमचं लॉजिक सोपं आहे.
प्रामाणिक अधिकारी हवा, पण जास्त प्रामाणिक नको!
सोशल मीडियावर लोकांचं एकच मत ही बदली नाही, ही प्रामाणिकपणाची शिक्षा आहे. कारण व्यवस्था सुधारणारा अधिकारी सत्तेला चालतो, पण व्यवस्था हादरवणारा अधिकारी कधीच चालत नाही.
२४ बदल्या — विक्रम की व्यवस्था घाबरली?
२००५ बॅचचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासाठी बदली ही नोकरीचा भाग नसून परंपरा झाली आहे. २१ वर्षांत २४ बदल्या म्हणजे प्रशासनाने त्यांना पोस्टिंग कमी आणि ट्रान्सफर जास्त दिल्या.
पण एक गोष्ट स्पष्ट आहे मुंढे जिथे जातात तिथे धूळ उडते, फाईली जाग्या होतात आणि भ्रष्टाचाराला ताप चढतो.आता प्रश्न एकच आहे:मदत व पुनर्वसन विभागातही मुंढेंचा तोच धडाका सुरू राहणार का, की पुन्हा एखाद्या लॉबीला दरारा नडणार?
इतकं मात्र नक्की व्यवस्था बदलायला एक मुंढे पुरतो…
आणि व्यवस्था वाचवायला मग संपूर्ण सिस्टीम बदल्यांची तोफ उघडते!
