अभय योजनेस मुदतवाढ द्या, सभागृह नेते बिडकरांची मागणी:15 फेब्रुवारीला मुदत संपणार, पुणेकरांना मिळणार आणखी संधी




पुणे महापालिकेकडून मिळकतकराची थकीत रक्कम 75 टक्के सवलतीत भरण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‌अभय योजनेची मुदत 15 फेबुवारी रोजी संपणार आहे. पुणेकर मिळकत धारकांकडून या योजनेस उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात थकीत कर देखील भरण्यात आलेला आहे. त्यामुळे योजनेस आणखीन एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. कर संकलन विभागाकडून ही योजना १५ नोव्हेंबर पासून लागू करण्यात आली. मोठ्या प्रमाणात करवसुली झाली असली, तरी अनेक थकबाकीदारांनी अद्यापही कर भरणा करणे बाकी आहे. योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ दिल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होतानाच पुणेकरांना देखील फायदा होणार आहे. त्यामुळे १५ मार्च २०२६ पर्यंत अभय योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी गणेश बिडकर यांनी केली आहे. “अभय योजनेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत जवळपास १ लाख ३५ हजारांच्यावर मिळकतकर धारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, ८०१ कोटी रुपयांपेक्षा जास्त कराची वसुली झाली आहे. पालिकेचा महसूल वाढवणे आणि नागरिकांना सवलतीचा लाभ देण्यासाठी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेला नागरिक अजून प्रतिसाद देत असल्याने या योजनेचा कालावधी वाढवणे आवश्यक आहे .पुणेकरांना आणखी एक संधी देण्यासाठी अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देणे आवश्यक आहे” असे गणेश बिडकर यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *