पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर २०२६ ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वजीराबाद येथील मारवाडी धर्मशाळेत राहणारे राजेश रमेशकुमार लड्डा (वय ३६) यांच्यासोबत हा प्रकार घडला. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर विविध शेअर मार्केट कंपन्यांमधील गुंतवणुकीसंदर्भात माहिती देत अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी विश्वास संपादन करून फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले. त्यांच्या आमिषाला बळी पडून फिर्यादीने एकूण ६ लाख ८० हजार रुपये पाठवले. मात्र, गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी फिर्यादी राजेश रमेशकुमार लड्डा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम ३१८(४) व ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मसपोनि बोयणे करीत आहेत. दरम्यान, शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी संबंधित संस्था, तिची अधिकृतता आणि बँक खात्यांची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post Views: 2
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad