बारावी इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी:कन्नडच्या जैतापूर प्रकरणी 19 जण निलंबित; झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालकासह 17 पर्यवेक्षकांवर कारवाई




जैतापूर (ता. कन्नड) येथील राष्ट्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने 19 जणांना निलंबित केले आहे. त्यात झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालकासह 17 पर्यवेक्षकांसह बैठ्या पथकाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात खासगी शिक्षणसंस्थांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. केंद्रावर 14 वर्गांमध्ये 370 विद्यार्थी होते. सामूहिक कॉपी प्रकरणी दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निर्णय बोर्ड घेईल, अशी माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी काल दिली होती. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली. सीसीटीव्हीत झाले चित्रण परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना जागेवरून उठण्याची परवानगी नसते. मात्र काही विद्यार्थी वर्गात कॉपीसाठी फिरताना दिसत होते. एका बाकावर 1 विद्यार्थी असा नियम असताना जैतापूरच्या राष्ट्रीय कनिष्ठ विद्यालयात एका बाकावर दोन-तीन विद्यार्थी कॉपीसाठी बसले होते. ज्या पर्यवेक्षकांवर कॉपी रोखण्याची जबाबदारी असते तेच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करत असल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. 23 जणांविरुद्ध गुन्हा बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला जैतापूर येथील राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक कॉपी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत विद्यार्थी दिसले होते. या प्रकरणी केंद्र संचालक व पर्यवेक्षकासह 23 जणांविरुद्ध देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली. जैतापूर केंद्रावरील सर्व कर्मचारी तडकाफडकी बदलण्यात आले आहेत. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केंद्र संचालक पी. सी. आव्हाळे, पर्यवेक्षक आर. के. दरे, पी. ए. लहाने, संजय कवे, एस. टी. घुले, पंढरीनाथ भिंगारे, डी. जे. गायकवाड, कैलास सोनवणे, श्रावण साळवे, कचरू राठोड, भाऊसाहेब शेळके, एकनाथ पेर, भानुदास सोनवणे, रामदास सातदिवे, रावसाहेब लिहणार, नथू निर्मळ, रमेश धुमाळ, हुकूमसिंह चांदवाडे, एफ. व्ही. चंदवाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks