![]()
नगर पालिका, महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या राजकारणातही ‘कार्यकर्ता” केवळ सतरंज्या उचलण्यापुरता उरला असून सत्तेच्या चाव्या मात्र दिग्गज नेत्यांच्या घराण्यांकडे जात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही सर्वच पक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यां ऐवजी नेत्यांच्या पत्नी, मुले आणि नातेवाईकांना झुकते माप दिले आहे. ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र असलेल्या या संस्थेत आता नेत्यांची दुसरी आणि तिसरी पिढी आपले नशीब आजमावत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवस प्रचार यंत्रणा थंडावली होती. शनिवारपासून त्यास वेग आला आहे. पंढरपूर व मंगळवेढ्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून व करमाळा येथे तालुका विकास आधाडीच्या माध्यमातून स्थानिक उमेदवारांच्या लढती होत आहेत. पालकमंत्र्यांकडून समर्थन एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो चांगला कार्यकर्ता असेल,पक्षासाठी चांगले काम करत असेल त्याचे योगदान विसरुन चालणार नाही.पण, असे सांगत पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही पक्षांतर्गतच्या घराणेशाहीचे समर्थनच केले होते. ”पक्षासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘तुमचे नाव सर्वेक्षणात खाली आहे” असे सांगून डावलले जात आहे,” अशी भावना अनेक इच्छुकांनी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर या घराणेशाहीमुळे मीठ चोळले गेले आहे. निष्ठावंतांची ही नाराजी मतपेटीतून कोणाला फटका देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सर्वेक्षणाचा केवळ बहाणा? भाजपने यावेळी उमेदवारी देताना सर्वेक्षणाचा आधार घेतल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत आहे. अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी आणि बंधू सागर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. हीच परिस्थिती माळशिरसमध्येही आहे. तिथे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर सोलापूरमध्ये माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज आणि माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजीत यांना संधी देण्यात आली आहे. मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकरांची प्रतिष्ठाही लागली पणाला माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील घराण्याने आपले वर्चस्व टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील आणि माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील हे निवडणूक लढवत आहेत. तसेच, आमदार उत्तम जानकर यांच्या पत्नी विमल आणि मुलगा जीवन हे रिंगणात आहेत. माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते, माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्या स्नुषा राजेश्वरी माने-पाटील, माजी उपाध्यक्ष सूर्यकांत माने-देशमुख यांचे चिरंजीव अमृतराज माने निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने माळशिरसचा लढा पूर्णपणे कौटुंबिक वर्चस्वाचा झाला आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षांतही घराणेशाहीतून उमेदवारांना संधी मोहोळ : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील यांनी वेगवेगळ्या गटातून व पक्षाकडूनही उमेदवारी मिळण्यासाठी दावेदारी केली आहे.
अक्कलकोट : माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे.
सांगोला: माजी आमदार दीपक साळुंखे यांचा मुलगा यशराज साळुंखे-पाटील रिंगणात आहे. माढा: माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सावंत यांचा मुलगा पृथ्वीराज सावंत यांना भाजपने संधी दिली आहे. दक्षिण सोलापूर : माजी सभापती (स्व.)गोपाळराव कोरे यांचा मुलगा माजी सभापती अप्पाराव हे मंद्रूप गणातून, त्यांची नात मंद्रूप गटातून निवडणूक लढत आहे.
निष्ठावंतांच्या जखमेवर ‘घराणेशाही''चे मीठ:नेत्यांची पुढची पिढीही रिंगणात, सोलापुरात भाजपसह सर्वच पक्षांकडून नेत्यांच्या घरात तिकिटे
