Gopichand Padalkar Slams Rohit Pawar Over MPSC Politics


“पुण्यात सुरू असलेले एमपीएससीचे (MPSC) आंदोलन हे विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी प्रायोजित केलेला हा अजेंडा आहे. 30 तारखेलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 पैकी 17 प्रतिनिधी रोहित पवारांचे असतानाही

.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय सेवेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कोल्हापुरात आयोजित ‘सेवा ज्योती यात्रे’नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी त्यांनी एमपीएससी आंदोलन, रोहित पवारांचे राजकारण, सांगली जिल्हा बँक निवडणूक आणि बाळूमामा ट्रस्ट गैरव्यवहारावर सरकारची सडेतोड भूमिका मांडली.

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करूनही श्रेयवादासाठी आंदोलनाचा हट्ट

एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पडळकर म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी कधीही इतका वेळ दिला नव्हता. 30 तारखेला झालेल्या बैठकीत 21 पैकी 17 विद्यार्थी प्रतिनिधी हे रोहित पवारांनीच पाठवलेले होते. फडणवीस साहेबांनी सर्व विषयांवर तोडगा काढल्यानंतर प्रतिनिधींनी आंदोलन मागे घेत असल्याचे लेखी दिले होते. मात्र, सर्व श्रेय ‘देवाभाऊंना’ जाईल या दृष्ट हेतूने रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरच बसवून ठेवले.”

कलम 317ची वस्तुस्थिती

“आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणे हा थेट राज्य सरकारचा अधिकार नाही. राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालानंतरच कारवाई होऊ शकते. हे कायदेशीर वास्तव ठाऊक असतानाही मुलांची उमेदीची वर्षे वाया घालवली जात आहेत. महाविकास आघाडीच्या काळात दळवी समितीने कार्यालयात बसून अहवाल दिला होता. आज वीर राधा यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समिती थेट विद्यार्थ्यांमध्ये जात आहे. तरीही आंदोलन ताणायचे कारण काय?”

सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना गावांत नेता व्हायचे आहे!

रोहित पवारांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर निशाणा साधताना पडळकर म्हणाले, “रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. ते थेट खेड्यापाड्यात फिरू शकत नाहीत. पुण्यात संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील मुले अभ्यास करायला येतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले तर आपोआप राज्यभर ओळख निर्माण होईल, असा हा निव्वळ राजकीय हिशेब आहे.”

काँग्रेसमध्ये मोठ्या पदासाठी धडपड

“राहुल गांधी मंगळवारी येणार म्हणून आंदोलनाची तारीख पुढे ढकलली जात आहे. रोहित पवारांना काँग्रेसमध्ये जायचे आहे आणि तिथे मोठी जागा हवी आहे. राहुल गांधींना गर्दी दाखवून इम्प्रेस करण्यासाठी ते एमपीएससीच्या पोरांचा वापर करत आहेत. पण ही पोरं हुशार आहेत, यांनी इतिहास-भूगोल वाचला आहे; ती कोणाच्या दावणीला बांधली जाणार नाहीत.”

अजित पवारांची जागा भरून काढण्याचा प्रयत्न

“अजितदादा पुण्याचे मोठे नेते होते. आता ती जागा रिकामी झाली असे समजून पुण्यात स्वतःचा ताबा मिळवण्याचा रोहित पवारांचा डाव आहे. सख्खे चुलत भाऊ पार्थ आणि जय यांना त्रास देणारे रोहित पवार आज सामान्य विद्यार्थ्यांचे तारणहार असल्याचा आव आणत आहेत.”

कोल्हापूरच्या विवेकानंद पाटीलमुळेच आंदोलन टिकले!

आंदोलनातील नेतृत्वावर बोलताना त्यांनी नमूद केले, “कोल्हापूरचा विवेकानंद पाटील नावाचा शेतकरी कुटुंबातील तरुण पोटतिडकीने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत आहे. रोहित पवारांकडे आंदोलनासाठी स्वतःचा चेहराच नव्हता; विवेकानंद पाटील बोलतोय म्हणून हे आंदोलन टिकले, अन्यथा दुसऱ्याच दिवशी हे गुंडाळले गेले असते.”

“रोहित पवारांनी पुण्यात पत्रकार भवन किंवा कोणत्याही स्टेडियमवर खुल्या चर्चेचे व्यासपीठ ठेवावे. मी स्वतः तिथे येतो, समोरासमोर चर्चा करू. सरकारचे काही चुकत असेल तर नक्की सुधारू; पण विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची पोळी भाजणे थांबवा.”

देवाभाऊंच्या काळात सर्वाधिक भरती; ‘सारथी’, ‘महाज्योती’ने दिला आधार

विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचताना ते म्हणाले, “महाराष्ट्रात सर्वाधिक सरकारी नोकऱ्या आणि भरती देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. 70 हजार पदांची महाभरती, 30 हजार पोलिसांची भरती आणि हजारो शिक्षकांची भरती याच सरकारने केली.”

“मराठा समाजासाठी ‘सारथी’, ओबीसींसाठी ‘महाज्योती’, भटक्या विमुक्तांसाठी ‘वनारटी’ आणि खुल्या प्रवर्गातील गरिबांसाठी ‘अमृत’ या संस्थांना प्रत्येकी 300-400 कोटींचा निधी देऊन सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकारी बनवले.” रोहित पवारांचे ट्विटर खाते हॅक झाल्याच्या दाव्यावर टोला लगावताना ते म्हणाले, “सकाळी 11 ते 5 या वेळेत त्यांच्या बारामती ॲग्रोचे पगारी कार्यकर्ते शिव्या घालण्यासाठी सक्रिय होतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा अजेंडा त्यांनीच रचला असावा.”

बाळूमामा ट्रस्ट घोटाळा, 60 कोटी खाणाऱ्या अधिकाऱ्यांना मातीतून उकरून काढू!

बाळूमामा देवस्थानच्या गैरव्यवहारावर पडळकरांनी आक्रमक पवित्रा घेतला. “बाळूमामांच्या मंदिरातील मेंढरे विकण्यापर्यंत या भ्रष्टाचाऱ्यांची मजल गेली होती. ट्रस्ट बरखास्त झाल्यानंतरही यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात 60-60 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकारी किंवा मुख्य संशयित कुठेही लपले तरी पोलीस त्यांना मातीतून उकरून बाहेर काढतील. त्यांना जेलमध्ये खडी फोडावीच लागेल.”

महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर नवा कायदा

“करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराप्रमाणेच बाळूमामा देवस्थानसाठीही राज्य शासन स्वतंत्र कायदा आणणार असून, भविष्यात अशा भ्रष्टाचाऱ्यांना ट्रस्टमध्ये थारा दिला जाणार नाही,” असा इशारा पडळकर यांनी शेवटी दिला.

——————————————

हेही वाचा…

रोहित पवारांच्या आंदोलनात 80% गुंड!: नवनाथ बन यांचा ‘व्हिडिओ बॉम्ब’ टाकून खळबळजनक आरोप; दिवसभर आंदोलनात, मध्यरात्री दारू पिऊन मुलीवरून राडे

पुण्यात सुरू असलेले आंदोलन हे एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी प्रायोजित केलेला हा शुद्ध राजकीय कार्यक्रम आहे. या आंदोलनात केवळ 20 टक्के निरागस विद्यार्थी असून, उर्वरित 80 टक्के हे बारामती ॲग्रोचे कर्मचारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि रोहित पवारांचे गुंड आहेत. हे कार्यकर्ते दिवसभर आंदोलनाच्या मंचावर बसून भाषणे ठोकतात आणि मध्यरात्री पुण्याच्या रस्त्यांवर मद्यधुंद अवस्थेत नाइट लाइफ एन्जॉय करत मुलींवरून राडे घालतात,” असा खळबळजनक ‘व्हिडिओ बॉम्ब’ फोडत भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत रोहित पवार आणि त्यांच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2026. All rights reserved. Theme Rubik News by Kantipur Themes