![]()
शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्थैर्याला प्राधान्य देत अनेक जोडपी वयाच्या तिसाव्या वर्षानंतर विवाह करत आहेत. तसेच पालकत्व देखील पुढे ढकलत आहेत. यामुळे देशातील एकूण प्रजनन दरावर विपरीत परिणाम होत असून, हा दर पुनर्स्थापना पातळीपेक्षा खाली आल्याबद्दल वैद्यकीय तज्ञ डॉ. निलेश बलकवडे यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, ओएसिस फर्टिलिटीने पुण्यात मोफत ‘जननी डायलॉग’चे आयोजन केले. प्रजनन आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि माहितीपूर्ण कुटुंब नियोजनावर चर्चा करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी ओएसिस अकॅडमीचीही घोषणा करण्यात आली. डॉ. बलकवडे यांनी सांगितले की, मानवी प्रजनन क्षमतेचे जैविक घड्याळ आपल्या नैसर्गिक गतीने चालते. त्यामुळे योग्य वेळी प्रजनन आरोग्यविषयी जागरूकता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अत्यंत महत्त्वाची आहे. ‘पॅरेंटहुड पॅरेडॉक्स’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ञांनी सखोल चर्चा केली. बदलती जीवनशैली आणि अपरिवर्तित जैविक वास्तव यातील वाढत्या अंतरामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर या संवादात भर देण्यात आला. योग्य माहिती आणि वेळेवर मार्गदर्शनाद्वारे योग्य निर्णय घेण्यास मदत करणे हेच या कार्यक्रमाचे ध्येय आहे. कुटुंब नियोजन ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, शासन, आरोग्य संस्था आणि समाजानेही यात सकारात्मक भूमिका बजावण्याची गरज आहे, असे डॉ. बलकवडे यांनी नमूद केले. ‘जननी डायलॉग’द्वारे शासन, आरोग्य क्षेत्र तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि समाज या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून कुटुंब नियोजन अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. हा एक सार्वजनिक हिताचा जनजागृती उपक्रम असून, योग्य आहार, व्यायाम आणि चर्चेतून सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. तर, ओएसिस अकॅडमीच्या माध्यमातून आरोग्य आणि वंध्यत्व उपचार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षण उपक्रम देखील राबवले जाणार आहेत. यावेळी डॉ. स्नेहा पारखी, डॉ. शरयू भालेराव, डॉ. श्रुती नाडेकर आणि डॉ. शरयू पाटील उपस्थित होते.
उशिरा विवाह ट्रेंडमुळे प्रजनन दरावर विपरीत परिणाम:डॉ. निलेश बलकवडे यांची पुण्यात चिंता व्यक्त, जनजागृतीवर भर देण्याचे मत व्यक्त
