कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरण:मुंबई हायकोर्टाच्य दणक्यानंतर शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण




कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अखेर आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजेरी लावत आत्मसमर्पण केले. डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांना कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १४ जुलै रोजी जामीन मंजूर केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढत, कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मंजूर केलेला जामीन तडकाफडकी स्थगित करत, त्यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी आज, रविवार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. तसेच जर म्हात्रे दिलेल्या मुदतीत विष्णूनगर पोलिसांना शरण आले नाहीत, तर त्यांच्या सर्व स्थावर मालमत्तांवर टाच जप्तीची कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या या दणक्यानंतर म्हात्रे यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. मालमत्ता जप्त होण्याच्या कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असल्याने, रमेश म्हात्रे यांनी आज ठरवून दिलेल्या वेळेच्या आत कल्याणमधील विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले आणि ते पोलिसांना शरण आले. आता पोलीस त्यांची अधिकृत अटकेची नोंद करून त्यांची वैद्यकीय तपासणी करतील आणि त्यांना पुढील प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर करतील. काय आहे संपूर्ण प्रकरण? काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात ड्युटीवर तैनात असलेल्या एका महिला डॉक्टरसह दोन पुरुष डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यावरून सत्ताधारी शिवसेनेसह राज्य सरकारवर चौफेर टीका झाली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरुवातीला अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद ऊर्फ प्रकाश निकम या तीन सह-आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मुख्य आरोपी म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत होता. सर्व बाजूंनी वाढलेल्या दबावानंतर म्हात्रे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. रुग्णालयाचा आडोसा आणि जामीन न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर म्हात्रे यांना तुरुंगात पाठवण्याऐवजी वैद्यकीय कारणांचा आडोसा घेत थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान अत्यंत नाट्यमय घडामोडीत त्यांना कल्याण कोर्टाकडून जामीनही मंजूर झाला. कनिष्ठ न्यायालयाच्या याच संशयास्पद जामीन प्रक्रियेवर आता मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आणि रमेश म्हात्रे यांना आज सायंकाळपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *