![]()
देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट यूजी 2026’ (NEET UG 2026) परीक्षेचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू केले
.
3 मे रोजी झालेल्या पहिल्या परीक्षेत पेपरफुटीचा गदारोळ झाल्यानंतर 29 जून रोजी पुनर्ररीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 16 जुलै रोजी लागलेल्या निकालाने एक नवा आणि अत्यंत धक्कादायक तांत्रिक घोटाळा समोर आणला आहे. अधिकृत ‘अन्सर की’नुसार (Answer Key) गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ‘फेल’च्या उंबरठ्यावर आणून ठेवल्याचा एक गंभीर पॅटर्न आता उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना आपली व्यथा मांडली. तसेच कोर्टात जाण्याचा इशारा दिला.
18-18 तास अभ्यास अन् पदरी फक्त 87 गुण; ज्ञानेश्वरीच्या स्वप्नांचा चक्काचूर!
बीडच्या वडवणी येथील हुशार विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी अनिलकुमार पवार हिची व्यथा कोणत्याही विद्यार्थ्याचे काळीज पिळवटून टाकणारी आहे. वर्षभर जेवणाची आणि झोपण्याची पर्वा न करता ज्ञानेश्वरीने रोज 18 ते 18 तास अभ्यास केला होता. ती टॉपरच्या शर्यतीत होती.
पुन्हा परीक्षा झाल्यानंतर जेव्हा तिने अधिकृत अन्सर की तपासली, तेव्हा तिला 720 पैकी तब्बल 702 गुण मिळत होते. तिने दिल्लीच्या प्रतिष्ठित ‘एम्स’ (AIIMS) रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले होते.
परंतु, जेव्हा स्कोअर कार्ड हातात आले, तेव्हा त्यावर अवघे 87 गुण पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या निकालामुळे ज्ञानेश्वरी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत.
“माझ्या मुलीला मुळात चुकीची ओएमआर (OMR) शीट जोडली गेली आहे. आम्ही पूर्ण पुराव्यानिशी सांगतोय की तिच्यावर अन्याय झाला आहे. ‘एनटीए’ने आम्हा सर्व पालकांना ओएमआर शीट लाईव्ह दाखवावी,” अशी आर्त मागणी तिची आई मीरा पवार यांनी केली आहे.
सोहमचीही तीच कहाणी; 522 गुणांवरून थेट 95 वर घसरण!
असाच धक्कादायक प्रकार बीडच्या सोहम नितीन गवते या विद्यार्थ्यासोबतही घडला आहे. कोणत्याही महागड्या खासगी शिकवण्या किंवा क्लासेस न लावता केवळ स्वतःच्या हिंमतीवर अभ्यास करणाऱ्या सोहमला अन्सर की नुसार 522 गुण मिळत होते. आपला वैद्यकीय शाखेतील प्रवेश निश्चित मानणाऱ्या सोहमला जेव्हा ‘एनटीए’ने ई-मेलवर स्कोअर कार्ड पाठवले, तेव्हा त्यावर अवघे 95 गुण होते. हा निकाल पाहिल्यापासून सोहम कमालीच्या मानसिक धक्क्यात असून, त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. सोहमच्या पालकांनी आता या अन्यायाविरोधात थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा पवित्रा घेतला आहे.
‘एनटीए’च्या पारदर्शकतेवर देशपातळीवर प्रश्नचिन्ह; 2.79 लाख विद्यार्थ्यांची पाठ
हा केवळ तांत्रिक घोळ आहे की गुण घोटाळा? असा प्रश्न आता संपूर्ण देशातून उपस्थित होत आहे. कारण अन्सर की मधील गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये शेकडो अंकांचा फरक आहे. बीडमधील या दोन प्रकरणांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अशा कितीतरी विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला असण्याची भीती आहे. ‘एनटीए’वरील उडालेल्या विश्वासामुळेच यंदाच्या पुनर्ररीक्षेला तब्बल 2.79 लाख विद्यार्थी अनुपस्थित राहिले. नीट परीक्षेच्या इतिहासातील अनुपस्थितीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे, जो विद्यार्थ्यांमधील नैराश्य स्पष्ट करतो.
पालकांचा उद्वेग
“मुलांनी रक्ताचे पाणी करून अभ्यास केला. उत्तरपत्रिका तपासली तेव्हा आम्ही आनंदी होतो, पण निकालाने घात केला. जर या तांत्रिक चुका तातडीने सुधारल्या नाहीत, तर आम्ही कोर्टात जाऊ.” — नितीन गवते, पालक, बीड
नीट पेपरफुटीचे सिंहावलोकन
- नीट पेपरफुटीचे धागे यापूर्वीच लातूरपर्यंत पोहचले आहेत. शिवराज मोटेगावकरला अटक झाली. त्यामुळे लातूरचे नाव देशभरात बदनाम झाले. सूत्रांनुसार, मोटेगावकर आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अभ्यासात सरासरीपेक्षा चांगले असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत असे. पालकांशी करार झाल्यानंतर त्यांना नियमित बॅचमध्ये समाविष्ट केले जात असे.
- परीक्षेपूर्वी शेवटच्या 15 दिवसांत ‘वन-ऑन-वन मेंटरिंग कोर्स’ चालवला जात असे. पेपर मिळताच या विद्यार्थ्यांना प्रश्न-उत्तरे पाठ करून घेतली जात होती. सीबीआयला यासंबंधीचे अनेक व्हिडिओही मिळाले आहेत.
- सीबीआयनुसार, मोटेगावकर अनेक वर्षांपासून पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारे यांच्यामार्फत प्रा. पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांच्या संपर्कात होता.
- नेटवर्कमध्ये सामील असलेल्या गुरुग्रामच्या यश यादवने जयपूरच्या विकास बिवालला NEET चा पेपर विकला होता. त्याला हा पेपर नाशिकच्या शुभम खैरनारकडून मिळाला होता.
लातूरचा कोचिंग संचालक आधी पार्ट-टाइम शिक्षक, आज ₹1500 कोटींची संपत्ती
- NEET पेपरफुटी प्रकरणात नवीन मोठे खुलासे झाले आहेत. CBI ला सुगावा लागला आहे की, गेल्या वर्षीही NEET चा पेपर परीक्षेपूर्वी महाराष्ट्रातील लातूर येथील रेणुकाई करिअर सेंटर (RCC) पर्यंत पोहोचला होता.
- कोचिंग संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकरची पेपरफुटी नेटवर्कशी जुनी संगनमतही समोर आली आहे. त्याची एकूण संपत्ती ₹1500 कोटी सांगितली जात आहे.
- भास्करने या कोचिंगमध्ये शिकणाऱ्या NEET 2025 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. यात 19 विद्यार्थ्यांचे AIIMS मध्ये सिलेक्शन झाले होते.
- 2 विद्यार्थ्यांचे AIIMS दिल्लीत, 5 विद्यार्थ्यांचे हैदराबादमध्ये आणि प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांचे भोपाळ व वाराणसी AIIMS मध्ये सिलेक्शन झाले. नागपूर, देवघर, गोरखपूर, राजकोट, रायपूर आणि मंगलगिरी AIIMS मध्येही प्रत्येकी एक-एक विद्यार्थी पोहोचले.
