समोर अभिमन्यू हा चक्रव्यूहात अडकला आहे. त्याला मारण्यासाठी दुर्योधन आणि कौरव आहेत. तुम्ही तिथेच आहात, पण तुम्ही कौरवाच्या की पांडवाच्या बाजूनं आहात, हे अजूनही ठरलेलं नाही.
अभिमन्यू चक्रव्यूहात जाताना त्याला माहित नाही, कोणीतरी त्याला वाचविण्यासाठी येईल अथवा नाही. तरीही त्यानं लढण्याचं ठरविलं आहे. त्याची जिद्द आणि संघर्ष पाहताना अनेकजण उलट टोमणे मारत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? कृष्णाचा अवतार येईल, अशी वाट पाहात असाल की अभिमन्यूनं कशी चूक केली हे सांगणार? तुम्ही कौरवाच्या बाजुचे की पांडवाचे हे महत्त्वाचे नाही. कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आणि विरोधक याच्याशी अभिमन्यूला देणे-घेणे नाही. कारण, जसजसा वेळ जातो, त्याचं जीवन धोक्यात येत आहे.
पण, या लढ्यात सत्य आणि न्यायासाठी लढणाऱ्या अभिमन्यूला साथ देताना तुम्हाला धृतराष्ट्रासारख्या डोळ्यावर पट्ट्या का बांधाव्या वाटतात. अर्थात कृष्ण म्हणजे लोकनायकाची भूमिका प्रत्येकालाच पार पाडावी लागणार आहे. किमान सत्य बोलून आणि खोट्या नॅरेटिव्हला विरोध करून…
विषय असा आहे की सत्ता बदलते, तसे नेते-पक्षही बदलात. पण, त्यांची ध्येय-धोरणे ही अनेक पिढ्यांवर परिणाम करतात. यूपीए सरकारनं माती खाल्ली म्हणजे एनडीए सरकारनं माती खावीच असे नाही. एकमेकांवर चिखलफेक खुशाल करावी, पण त्यात जनतेचा बळी नको.
दोन्ही सरकारकडून खूप चुका होतात. पण, याचा अर्थ जनतेनं दोन्ही सरकारला आंधळेपणानं स्वीकारावं का? जनतेलाच जर सोयरसुतक नाही, नसेल तर सरकारही तसेच राहणार.
सोनम वांगचुक यांच्या वडिलांनीदेखील लडाखमधील प्रश्नांसाठी इंदिरा गांधी यांचे सरकार असताना आंदोलन केले होते. त्यांचे वडील मंत्रीदेखील होते. पण, सोनम वांगचुक यांनी नेहमीच शिक्षणामधील आमुलाग्र बदल, संशोधनाला प्रोत्साहन, पर्यावरण आणि स्थानिक विकास यांच्यासाठी केवळ लढाच नव्हे योगदान देखील दिलं आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि हेतूबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. जर प्रत्यक्ष देव जरी आला तरी सध्याचे अंधभक्त देवाला देशद्रोही ठरवतील, काँग्रेसचे किंवा भाजपाचे समर्थक ठरवतील अशी स्थिती आहे. यावेळेस काँग्रेसचे अनेक समर्थक आणि नेतेसुद्धा अंधभक्त झाले आहेत. २०१४ मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर सत्ता गेल्याचं काँग्रेसला झालेलं दु:ख कमी झालेलं नाही. ते लोकशाही मार्गानं लढात देत आहेत. पण, धड सत्ताधारी आणि विरोधकांचा पाठिंबा नसलेलं सोनम वांगचुक यांचे आंदोलन कुणासाठी आहे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
सोन वागंचुक यांनी पाकिस्तान-चीनमध्ये जायला हवं?
शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी लडाखमधील अतिथंडीत भारतीय जवानांना उबदार राहण्यास मदत करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे टेंट विकसित केले आहेत. जर त्यामुळे हे देशद्रोही असतील तर नक्कीच!
सोन वांगचुक यांचं खरेच शिक्षण झाले आहे का?
वांगचुक यांची एखाद्या महान (?) नेत्यासारखी डिग्री हरविली नाही. तसेच त्यांच्या डिग्रीबाबत कोणत्याही न्यायालयानं माहिती विचारण्याला दंड केला नाही. ते मॅकनिकल इंजिनिअर आहेत.
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधील लोक त्यांना संशोधक म्हणतात का?
सोनम वांगचुक यांनी ‘नापास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा’ सुरू केली. तिथे पारंपरिक अभ्यासक्रमाऐवजी विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा, सेंद्रिय शेती, नेटवर्किंग आणि व्यावहारिक जीवनकौशल्ये शिकवली जातात. दुसऱ्या एखा संस्थेत
विद्यार्थी प्रत्यक्ष संशोधन करून आव्हानांवर शाश्वत उपाय शोधण्याचे काम करतात.
शिक्षणामुळेच चांगले जीवनमान आणि स्वत:च्या प्रगतीची संधी मिळते, याबाबत अजूनही लोकांचा विश्वास आहे. पण, पेपरफुटीमुळे आणि शिक्षणक्षेत्रातील अनागोंदीमुळे या विश्वासाला तडा जात आहे. त्यावर सरकारकडून उपाययोजना करण्यासाठी एक शब्ददेखील उच्चारला जात नाही. उलट काही घडलेच नाही, असे दाखविले जाते. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांनी निराश होत आत्महत्या केली नाही का? दोन उद्योगपतींच्या हातात देशाची साधनसंपत्ती दिली जात असताना जनतेनं केवळ शिक्षण क्षेत्रातील बदलाची अपेक्षा करू नये का? जर हे बदल झाले नाहीतर गरीब परिस्थितीमधून आयएएस असो की डॉक्टर होणार नाहीत.
केवळ पैसे चारून मोठी पदे मिळत असतील तर सगळी यंत्रणा हे भ्रष्टाचाराच्या टेकूवर चालेल. असा डोलारा कुणाच्याही भल्याचा नाही. पेपरफुटीतून पास झालेले डॉक्टर तुमच्यावर उपचार करतील तेव्हा तुम्ही चांगल्या उपचाराची अपेक्षा करू शकणार नाही. तसेच राजकीय आर्शिवादानं अधिकारी होणारे लोक जनतेला कोणता न्याय देतील?
-श्रीकांत पवार
