![]()
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची संघटन शक्ती या दोनच गोष्टींच्या जोरावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी भारतीय किसान संघ राज्यभर मेळावे घेऊन शेतकऱ्यांना संघटित करत आहे. आगामी काळात आपल्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष करावा लागेल, असा विश्वास पद्मश्री कृषी संशोधक डॉ. श्रीरंगदादा लाड यांनी व्यक्त केला. अहमदपूर तालुक्यातील राजूर येथील साईगणेश मंगल कार्यालयात भारतीय किसान संघाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येलाले, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, निवृत्त सिंचन सचिव घोटे, महिला विभाग प्रमुख शामल हुरदळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. लाड म्हणाले, देशाचे उत्पन्न शेतकर्यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकर्यांनी तंत्रशुद्ध शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आम्ही कापूस पिकावर प्रयोग करून एकरी २५ क्विंटल कापूस उत्पादित होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. आता आमचा मोर्चा ज्वारीकडे वळला असून, एकरी किमान ५० क्विंटल ज्वारीचे उत्पन्न घेण्याबाबतचे संशोधन सध्या सुरू आहे. उत्पन्न वाढीसोबतच शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी सर्व शेतकर्यांनी एकत्र येऊन संघर्ष करणे गरजेचे आहे. या मेळाव्यात तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, निवृत्त सिंचन सचिव घोटे, आणि मधुमक्षिका पालक दिनकर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमोल नरहारे व गोविंद गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार मजगे यांनी केले. सरकारच्या जाचक अटींवर किसान संघाने आवाज उठवावा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बब्रुवान खंदाडे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासकीय योजना असल्या तरी शेतकऱ्यांनी स्वतःहून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. तसेच सरकारनेही शेतमालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. पीक विमा आणि त्यातील जाचक अटींमुळे शेतकरी अडचणीत असून, भारतीय किसान संघाने या समस्या सरकार दरबारी मांडून त्या सोडवाव्यात, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी मेळावा:आधुनिक शेती, संघटन शक्तीनेच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील- पद्मश्री डॉ. श्रीरंगदादा लाड
