Rohini Khadse Slams Maharashtra Govt Over Free Saree Scheme Cancellation


राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 92 लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्य सरकारने गरीब आणि गरजू महिलांना मिळणारी ‘मोफत साडी वितरण योजना’ आर्थिक टंचाईचे कारण देत गुंडाळली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर

.

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल: ‘निवडणुकीपुरती आश्वासने’

मोफत साडी योजना बंद झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’ (ट्विटर) द्वारे सरकारवर निशाणा साधला. “निवडणुकीत आश्वासनांची खैरात… निवडणुकीनंतर मात्र आर्थिक भार!” अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले.

“जर एखादी योजना राज्यावर इतका आर्थिक भार टाकणार होती, तर तिची घोषणा करताना हा हिशोब कुठे गेला होता? तेव्हा अर्थतज्ज्ञ सुट्टीवर होते का? की निवडणुकीच्या रणधुमाळीत आर्थिक शिस्तीलाही सुट्टी देण्यात आली होती?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींसाठी योजना जाहीर करायच्या, मोठमोठ्या जाहिराती द्यायच्या आणि निवडणूक संपली की अचानक तिजोरी रिकामी झाल्याची आठवण यायची, हा महायुतीचा कारभार आहे. निवडणुकीत महिलांची मते मिळवण्यासाठी राजकीय श्रेय लाटून आता योजना बंद करत सरकारने स्वतःचा खरा चेहरा दाखवला आहे. हे राज्यातील महिलांचा विश्वासघात करणारे सरकार आहे, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.

महिला, गरीब कुटुंबे आणि अंत्योदय लाभार्थ्यांना दिलेली आश्वासने केवळ निवडणुकीपुरतीच होती, हे आता स्पष्ट झाले असून महिलांच्या अपेक्षांशी खेळ करणे हीच महायुतीची शासनपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहिणी खडसेंचा खोचक टोला: ‘आता साडीही परवडेनाशी झाली?’

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.

आश्वासनांचा पाऊस आणि आता माघार

“2100-1500 सोडा, आता लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडेनाशी झाली? निवडणुकीपूर्वी घोषणा केल्या, आश्वासनांचा पाऊस पाडला आणि आता आर्थिक तुटवड्याचं कारण पुढे करून योजना बंद करता? जर राज्याची आर्थिक स्थिती इतकीच बिकट होती, तर निवडणुकीत आश्वासने कोणत्या हिशेबाने दिली होती?”

भावा-बहिणीच्या नात्यावरून टोला

“तुम्ही तर इस्टेटसाठी बहिणीला खोटं आश्वासन देऊन हक्कसोड पत्र मिळवणाऱ्या भावापेक्षाही वाईट आहात. आधी मतांसाठी आश्वासने दिली, आता निवडणुका नाहीत म्हणून सगळंच काढून घेत आहात!” अशी टीका त्यांनी केली.

योजना का बंद करण्यात आली?

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात अत्यंत गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली ‘मोफत साडी वितरण योजना’ बंद करण्याचा शासन निर्णय (GR) वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी जारी केला. योजना बंद करण्यामागे सरकारने ‘वाढत्या आर्थिक भाराचे’ कारण दिले आहे. वस्त्रोद्योग विभागांतर्गत सध्या अनेक लोककल्याणकारी आणि व्यावसायिक योजना सुरू आहेत. या योजनांसाठी द्यावे लागणारे आर्थिक साहाय्य आणि शासनाची इतर विविध आर्थिक दायित्वे लक्षात घेता, पुढील आर्थिक वर्षात मोफत साडी योजना सुरू ठेवणे संयुक्तिक ठरणार नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

काय होती ‘मोफत साडी’ योजना?

‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28’ अंतर्गत जून 2023 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. राज्यातील यंत्रमाग क्षेत्राला शाश्वत मागणी मिळवून देणे आणि अत्यंत गरीब अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना सणासुदीला दर्जेदार वस्त्र देणे, हा यामागील मुख्य हेतू होता. राज्यातील सुमारे 25 लाख गरीब (अंत्योदय) कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत होता. या साड्यांसाठी राज्य सरकार दरवर्षी १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करत होते.

सन 2023, 2024 आणि 2025 अशी सलग तीन वर्षे या साड्यांचे यशस्वी वितरण झाले होते. मात्र, चालू वर्ष 2026 मध्ये ही योजना कायमची बंद झाल्यामुळे यंदाच्या दिवाळीत गरीब कुटुंबांना या शासकीय साडीचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेतील कडक निकषांनंतर आता अत्यंत गरीब कुटुंबांसाठी असणारी हक्काची मोफत साडी योजनाही बंद झाल्याने, सर्वसामान्य नागरिकांमधून आणि विरोधी पक्षांकडून सरकारवर मोठी नाराजी व्यक्त होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा…

‘जयंतराव पुरोगामी वारसा सोडणार नाहीत’:राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर सतेज पाटलांचे वक्तव्य; म्हणाले- 2029 मध्ये बदल निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीत (NDA) सामील होणार असून, त्यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचल्या आहेत. या सर्व चर्चांना बळकटी मिळाली ती जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे. या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *