प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची हेळसांड:माजी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली निलंबनाची मागणी




हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेची हेळसांड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. माजी आमदारांनी केलेल्या तक्रारीनुसार, चिखलदरा तालुक्यातील खुटीदा येथील एक महिला १९ जानेवारीच्या रात्री हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळी दवाखान्यात कोणतेही डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या व्हरांड्यात झाली, असा आरोप आहे. प्रसूतीनंतरही तिला कोणतीही आरोग्य सेवा किंवा उपचार मिळाले नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे. अखेर नातेवाईकांनी तिला घरी परत नेले. या घटनेनंतर पीडित महिलेने माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे तक्रार केली. पटेल यांनी या तक्रारीच्या आधारे अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणावर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “मी या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्या महिलेची प्रसूती व्हरांड्यात नव्हे, तर रुग्णवाहिकेत झाल्याचे कळले आहे. मात्र, त्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविल्याशिवाय अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही.” डॉ. पारिसे यांनी सोमवारपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवून पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *