![]()
१२ हजार ६०० कोटींचे बजेट असलेल्या पुणे महापालिकेसाठी महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटातील महिलांसाठी जाहीर झाल्याने सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये महापौरपदासाठी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत दिग्गज नगरसेविकांचा भरणा असून भाजप खुल्या गटातून खुल्या प्रवर्गातील नगरसेविका अथवा ओबीसी प्रवर्गातील नगरसेविकांना संधी देणार यावरून उत्कंठा निर्माण झाली आहे. दरम्यान, ९ वर्षांपूर्वी दिवंगत मुक्ता टिळक यांनी महापौरपद भूषवले होते. भाजपकडून वर्षा तापकीर, निवेदिता एकबोटे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, मंजूषा नागपुरे, स्मिता वस्ते, सायली वांजळे, ऐश्वर्या पठारे या भाजपच्या नगरसेविका प्रामुख्याने स्पर्धेत आहेत. यापैकी काही जणी मूळ ओबीसी प्रवर्गातील आहेत, परंतु खुल्या जागेवर निवडून आल्या आहेत. यानिमित्ताने भाजप नेतृत्व अनुभवासोबतच जातीय समीकरणांचा महापौरपदासाठी विचार करणार का याची उत्कंठा वाढली आहे. तापकीर, टिळेकर अनुक्रमे चार व पाचव्यांदा विजयी वर्षा तापकीर आणि रंजना टिळेकर या अनुक्रमे चार आणि पाचव्यांदा विजयी झाल्या असून मंजूषा नागपुरे आणि मानसी देशपांडे या तिसऱ्यांदा महापालिकेत विजयी झाल्या आहेत. २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तापकीर आणि टिळेकर यांना कुठल्याही पदावर संधी मिळालेली नाही. टिळेकर या विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री आहेत. मंजूषा नागपुरे या यंदा बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्राचार्य असलेल्या निवेदिता एकबोटे प्रथमच नगरसेवक मानसी देशपांडे या पर्वती मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. रंजना टिळेकर या हडपसर मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. मानसी देशपांडे या बिबवेवाडी परिसरातून तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. पर्वती मतदारसंघाच्या आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या त्या भावजय आहेत. निवेदिता एकबोटे या प्रथमच नगरसेवकपदावर निवडून आलेल्या असून नामांकित मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यदेखील आहेत. भाजप युवा मोर्चामध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले. पिंपरी-चिंचवडमध्ये काटे, चांदगुडे, रेसमध्ये पुणे| राज्यातील श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण खुला गट आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, बिनविरोध निवडून आलेल्या सुप्रिया चांदगुडे व सर्वाधिक १६ हजार मताधिक्याने निवडून आलेल्या सारिका गायकवाड यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपने बहुमतापेक्षाही जास्त (८४ जागा) मिळवल्या आहेत. आता सर्वसाधारण विजयी नगरसेवकांपैकी महिला किंवा पुरुष नगसेवकाला महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सुप्रिया चांदगुडे यांचे नाव आघाडीवर आहे. त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे. सभागृह नेतेपदासाठी पुरुष नगरसेवकांमध्ये चुरस महापौरपदासाठी महिला आरक्षण पडल्याने इच्छुक नगरसेवक काहीसे नाराज आहेत. मागील सत्ताकाळात सभागृह नेतेपद भूषवलेले गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले आणि धीरज घाटे हे महापौरपदासाठी तीव्र इच्छुक होते. विशेष असे की बीडकर यांनी पुणे पॅटर्नमध्ये स्थायी समिती अध्यक्षपद, शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे, तर भिमाले आणि घाटे या विधानसभेसाठीदेखील इच्छुक असताना त्यांना संधी मिळाली नाही.
साडेबारा हजार कोटींचे बजेट असलेल्या पुणे मनपात 9वर्षांनंतर महिला महापौर:वर्षा तापकीर, निवेदिता एकबोटे, रंजना टिळेकरांची नावे चर्चेत
